फिलीप ह्य़ूजेसच्या अकाली निधनानंतर, भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे भवितव्य अधांतरी झाले होते, मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दौऱ्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर करत सर्व शंकांना पूर्णविराम दिला आहे.
नव्या कार्यक्रमानुसार पहिली कसोटी ९ ते १३ या कालावधीत ह्य़ूजेसच्या निवासगावी अर्थात अ‍ॅडलेडला होणार आहे. मूळ कार्यक्रमानुसार ४ तारखेपासून ब्रिस्बेन कसोटीने दौऱ्याला सुरुवात होणार होती, मात्र ह्य़ूजेसच्या निधनानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना बसलेल्या धक्क्य़ामुळे हा दौराच संकटात सापडला होता. मात्र पहिली कसोटी पुढे ढकलत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना दु:खातून सावरण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला आहे.
दुसरी कसोटी १७ डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे होणार आहे. तिसरी कसोटी मेलबर्न येथे २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे, तर चौथी आणि शेवटची कसोटी ६ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
ह्य़ूजेसच्या निधनामुळे भारतीय संघाचा अध्यक्षीय संघाविरुद्धचा दुसरा सराव रद्द करण्यात आला होता. मात्र आता पहिली कसोटी पुढे ढकलण्यात आल्याने भारतीय संघासाठी सराव सामन्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यातील सविस्तर चर्चेनंतर सुधारित कार्यक्रम तयार करण्यात आल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.
या अवघड कालावधीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सुदरलँड यांनी बीसीसीआयचे आभार मानले आहेत.
ऑस्ट्रेलियातील क्रिकेट वर्तुळावर ओढवलेल्या परिस्थिती बीसीसीआयने समजून घेतली, त्यांच्या सहकार्यामुळेच सुधारित कार्यक्रमाची आखणी करता आल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या कार्यक्रमामुळे ब्रिस्बेन कसोटीपूर्वी तीन, तर मेलबर्न कसोटीपूर्वी खेळाडूंना चार दिवसांची विश्रांती मिळणार आहे. भरगच्च कार्यक्रमामुळे खेळाडूंना थकवा येऊ नये यासाठी सिडनी कसोटीच्या तारखा बदलण्यात आल्या असून, आता ही कसोटी ६ जानेवारीला सुरू होणार आहे. यामुळे मेलबर्न कसोटीनंतर खेळाडूंना सहा दिवसांची विश्रांती मिळणार आहे.
कसोटी मालिकेनंतर होणाऱ्या एकदिवसीय तिरंगी मालिकेपूर्वी खेळाडूंना पाच दिवसांचा विश्रांती कालावधी मिळू शकणार असल्याचे सुदरलँड यांनी स्पष्ट केले.
कसोटी मालिकेचा सुधारित कार्यक्रम
पहिली कसोटी- अ‍ॅडलेड- ९ ते १३ डिसेंबर
दुसरी कसोटी-ब्रिस्बेन- १७ ते २१ डिसेंबर
तिसरी कसोटी-मेलनर्ब-२६ ते ३० डिसेंबर
चौथी कसोटी-सिडनी- ६ ते १० डिसेंबर