कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पुणे कसोटी तब्बल ३३३ धावांनी गमावली. कांगारुंनी कोहली ब्रिगेडला अवघ्या तीनच दिवसात गुंडाळले. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमच्या खेळपट्टीवर अवघ्या तीन दिवसांत ४० विकेट्स पडल्या. भारतीय संघाचा हा आजवरचा सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला. भारतीय चाहत्यांनी यावेळी संघातील खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीसोबतच खेळपट्टीवर देखील टीका केली होती. अखेर या सामन्याचे पंच ख्रिस ब्रॉड यांनीही पुण्याच्या खेळपट्टीवर ताशेरे ओढले आहेत. ब्रॉड यांनी सामना झाल्यानंतर खेळपट्टीचे परिक्षण केले व त्याचा अहवाल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे(बीसीसीआय) पाठवला आहे. पुण्याची खेळपट्टी सुमार दर्जाची असल्याचे ब्रॉड यांनी अहवालात नमूद केले आहे. याशिवाय, अहवालावर बीसीसीआयला १४ दिवसांत प्रतिक्रिया देण्यासही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सांगितले आहे. पुण्याच्या खेळपट्टी संदर्भातील संपूर्ण अहवाल बीसीसीआयकडे सुपूर्द करण्यात आला असून त्यांच्याकडे प्रतिक्रिया देण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी आहे, असे ख्रिस ब्रॉड म्हणाले.
खेळपट्टीच्या गुणवत्तेची चाचणी करण्यात आल्यानंतर खेळपट्टी सुमार दर्जाची असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावर आता बीसीसीआयच्या स्पष्टीकरणाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. ‘बीसीसीआय’कडून देण्यात येणारे स्पष्टीकरण पुढे आयसीसीचे महाव्यवस्थापक जेफ अल्लार्डीस आणि सामना पंचांच्या एलिट पॅनलचे रंजन मदुगल्ले यांच्याकडून आढावा घेण्यात येणार आहे.
याआधी २०१५ साली द.आफ्रिकेविरुद्धच्या नागपूर कसोटीवेळी आयसीसीने खेळपट्टीवर ताशेरे ओढले होते. नागपूरच्या जामठा खेळपट्टीवर द.आफ्रिकेचा संपूर्ण संघ अनुक्रमे ७९ आणि १८५ अशा धावांत बाद झाला होता. भारतीय संघाने सामन्यात १२४ धावांनी विजय प्राप्त केला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2017 5:15 pm