भारतीय संघ गुरुवारी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीला सामोरे जाणार आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला भारतीय संघाचे पारडे या सामन्यात नक्कीच जड मानले जात आहे. तरीसुद्धा ऑस्ट्रेलियाच्या संघानेही भारताचे आव्हान फोडून काढण्यासाठीचा गृहपाठ केला आहे. भारतीय निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिला दोन कसोटींसाठी बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी खेळविण्यात आलेला संघ कायम ठेवला आहे. पण अंतिम अकरा खेळाडूंमध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. गुरूवारी सामन्याचा नाणेफेक झाल्यानंतर भारताच्या अंतिम संघाची माहिती मिळेल.

 

भारतीय संघात सलामीजोडीसाठी केएल राहुल आणि मुरली विजय ही जोडी कायम ठेवण्यात येईल याची शक्यता जास्त आहे. चेतेश्वर पुजारा संघात तिसऱया तर कर्णधार कोहली त्यापाठोपाठ फलंदाजीला उतरेल. संघात यावेळी अजिंक्य रहाणेला जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. वृद्धीमान साहा याचा संघात यष्टीरक्षक म्हणून समावेश होईल. तर फिरकीची जबाबदारी आर.अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यावर असेल. या दोघांसोबतच जयंत यादवच्या स्वरुपात तिसऱया फिरकीपटूंचा समावेश होऊ शकतो. जयंत यादव फिरकीसोबतच चांगली फलंदाजी देखील करु शकतो. तर पुण्याच्या खेळपट्टीवर फिरकीला चांगली साथ मिळू शकते. या अनुशंगाने भारतीय संघ उद्या तीन फिरकीपटूंसह खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा उमेश यादव आणि इशांत शर्मा यांच्यावर असेल.

असा असू शकतो भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, अश्विन, जडेजा, जयंत यादव, उमेश यादव, इशांत शर्मा.