भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातली वन-डे मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. वानखेडे मैदानावर पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर, राजकोटमध्ये भारताने दमदार पुनरागमन केलं. या मालिकेतला अखेरचा सामना रविवारी बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे. पहिल्या सामन्यातील सर्व चुका सुधारत भारतीय संघाने राजकोट वन-डे सामन्यात अष्टपैलू खेळ केला.

मालिकेत बाजी मारण्यासाठी दोन्ही संघांना अखेरच्या सामन्यात विजय मिळवण्याची आवश्यकता आहे. जाणून घेऊयात काय सांगते आकडेवारी…

१ – २१ व्या शतकात बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर वन-डे क्रिकेटमध्ये भारताला पराभूत करणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे. २००१ पासून भारतीय संघ या मैदानावर १० आंतरराष्ट्रीय वन-डे सामने खेळला आहे, ज्यापैकी ६ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. दोन सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे, आणि हे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होते.

२००७ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धचा वन-डे सामना आणि २०११ साली विश्वचषकातला इंग्लंडविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला होता.

१/६ – ऑस्ट्रेलियाचा संघ बंगळुरुमध्ये गेल्या ६ सामन्यांपैकी एक सामना हरलेला आहे. ऑस्ट्रेलियाने हा एकमेव सामना भारताविरुद्धच गमावलेला होता.

१२.६ – वन-डे क्रिकेटमध्ये विराट कोहलीची बंगळुरुच्या मैदानावरील फलंदाजी सरासरी आहे अवघी १२.६ … या मैदानावर आपल्या शेवटच्या ५ सामन्यांमध्ये विराटने केवळ ६३ धावा केल्या असून…त्याची सर्वोच्च धावसंख्या ही ३४ आहे. भारतीय संघासाठी ही बाब चिंताजनक ठरु शकते.

५३.४६ – दोन देशांमधील वन-डे मालिकेच्या अखेरच्या सामन्यात गेल्या ११ सामन्यांची आकडेवारी तपासली तर रोहितची फलंदाजी आश्वासक राहिलेली आहे. त्याने ५३.४६ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. यातील ४ सामन्यांत पहिल्यांदा फलंदाजी करताना रोहितने ४२८ धावा काढल्या असून यात एका द्विशतकाचाही समावेश आहे.

मात्र धावसंख्येचा पाठलाग करताना रोहितच्या नावावर फक्त १६० धावाच जमा आहेत…आणि या निकषात त्याच्या फलंदाजीची सरासरी आहे ती २२.८६

६६.६७ – २०१६ वर्षाच्या सुरुवातीपासून विराट कोहलीची दोन देशांमधील मालिकेच्या अंतिम सामन्यात फलंदाजीची सरासरी आहे ६६.६७, यादरम्यान ६ सामन्यांमध्ये विराटने ४०० धावा केल्या आहेत.

९८ – ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने आपल्या ६० वन-डे सामन्यांच्या कारकिर्दीत ९८ बळी घेतले आहेत. आतापर्यंत केवळ ५ ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी ६० वन-डे सामन्यांच्या कारकिर्दीत १०० बळी घेतले आहेत. मुंबईत कमिन्सने २ बळी घेतले, मात्र राजकोटमध्ये त्याला अपयशाचा सामना करावा लागला.

१७ – कर्णधार या नात्याने विराट कोहलीला ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी केवळ १७ धावांची गरज आहे. विराटला हे जमल्यास अशी कामगिरी करणारा तो ८ वा कर्णधार ठरेल.

४ – उप-कर्णधार रोहित शर्माला वन-डे क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी ४ धावांची गरज आहे. रोहितच्या खात्यात सध्या ८ हजार ९९६ धावा जमा आहेत. त्यामुळे अखेरच्या सामन्यात रोहितकडे हा विक्रम करण्याची संधी आहे.