आत्मविश्वास उंचावलेल्या भारताचा ऑस्ट्रेलियावर मोठय़ा विजयाचा निर्धार; लढतीवर पावसाचे सावट

एकदिवसीय लढतीची ट्वेन्टी-२० लढत झाल्यावरही पहिल्या एकदिवसीय सामन्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाने पावसाचे सावट असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दणदणीत विजयाचा निर्धार केला आहे. यासाठी सलामीच्या सामन्यात अपयशी ठरणाऱ्या आघाडीच्या फळीने कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे, तसेच फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात सातत्य राखायला हवे.

कुलदीप यादव आणि यझुवेंद्र चहल या भारताच्या नव्या फिरकी जोडीपुढे पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना झगडायला लागले होते. यादवच्या फिरकीची जादू आणि चहलची अचंबित करणारी गोलंदाजी उर्वरित सामन्यातही ऑस्ट्रेलियासाठी आव्हानात्मकच ठरणार आहे. फिरकीशी आत्मविश्वासाने सामना करण्यासाठी पाहुण्या फलंदाजांनी स्थानिक मनगटी फिरकी गोलंदाजांसोबत कसून सराव केला. चेन्नईत मालिकेला प्रारंभ होण्यापूर्वी केरळच्या के. के. जियासची मदत ऑस्ट्रेलियाने घेतली होती. याशिवाय आशुतोष शिवराम आणि रुपक गुहा या स्थानिक गोलंदाजांसह ईडन गार्डन्सवर सराव करण्यात आला.

पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी २१ षटकांत १६४ धावांचे आव्हान समोर ठेवण्यात आले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची ४ बाद ३५ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. मग ग्लेन मॅक्सवेलने धुवाँदार फटकेबाजी करीत विजयाच्या आशा निर्माण केल्या. मात्र चहल-यादव जोडीने आपली भूमिबाज चोख बजावत डकवर्थ-लुइस नियमाचा वापर करण्यात आलेल्या या सामन्यात २६ धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात भारताची अवस्थासुद्धा ६ बाद ७६ अशी झाली होती. मात्र हार्दिक पंडय़ाने वादळी फलंदाजी करीत ७ बाद २८१ अशी समाधानकारक धावसंख्या संघाला उभारून दिली. पंडय़ाने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीत चौथ्यांदा षटकारांची हॅट्ट्रिक साजरी केली. त्याने ६६ धावांत ८३ धावांची खेळी साकारली आणि महेंद्रसिंग धोनी (८८ चेंडूंत ७९ धावा) सोबत ११८ धावांची सामन्याला कलाटणी देणारी महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. पंडय़ाने ही खेळी साकारताना ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फिरकी गोलंदाज अ‍ॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला.

२०१५च्या आयपीएलमध्ये दिमाखदार कामगिरी बजावल्यानंतर पंडय़ा उदयास आला आहे. त्यावेळी बेजबाबदार फटकेबाजी करणारा पंडय़ा आता जबाबदारीने परिपक्व फलंदाजी करू लागला आहे. याशिवाय उपयुक्त मध्यमगती गोलंदाजीसुद्धा करीत असल्यामुळे एक परिपूर्ण अष्टपैलू खेळाडू म्हणून तो उदयास येत आहे.

ऑस्ट्रेलियाकडे झम्पा वगळता ग्लेन मॅक्सवेल आणि ट्रॅव्हिस हेड असे दोन कामचलाऊ फिरकी गोलंदाज आहेत. आमच्या गोलंदाजीच्या माऱ्यात वैविध्य आहे, परंतु योजना राबवण्यात आम्ही अपयशी ठरलो, अशी प्रतिक्रिया झम्पाने व्यक्त केली होती. कर्णधार स्टीव्ह स्मिथसाठी हा आव्हानात्मक काळ आहे, असा इशारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने दिला होता.

डेव्हिड वॉर्नरने दर्जाला साजेशी मोठी खेळी साकारण्याची आवश्यकता आहे. हिल्टन कार्टराइट सलामीच्या स्थानाला न्याय देऊ शकला नसल्याने सराव सामन्यात ६५ धावांची खेळी साकारणाऱ्या हेडला संधी देता येईल. मग चौथ्या स्थानावर मॅक्सवेल किंवा मार्कस स्टॉइनिस उत्तम फलंदाजी करू शकतील. मधल्या फळीतील मॅक्सवेल, स्टॉइनिस आणि जेम्स फॉल्कनर यांच्यावर ऑस्ट्रेलियाची विशेष मदार आहे.

भारताची आघाडीची फळी कोसळली तरी धोनीच्या साथीने आता तळाची फलंदाजीसुद्धा जबाबदारीने डाव सावरू लागली आहे. भुवनेश्वर कुमारनेही पहिल्या सामन्यात नाबाद ३२ धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांच्याकडून दमदार सलामीची अपेक्षा आहे. चेन्नईत अपयशी ठरलेल्या कर्णधार विराट कोहलीकडूनही दिमाखदार खेळीची आशा आहे. यंदाच्या वर्षी कोहलीने १९ एकदिवसीय डावांमध्ये चार शतके आणि सहा अर्धशतकांसह एकंदर १०१७ धावा केल्या आहेत.

सांग सांग भोलानाथ, वनवास संपेल काय?

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळे क्रिकेटरसिकांमध्ये चिंता पसरली आहे. ईडन गार्डन्सवर उभय संघांमध्ये नोव्हेंबर २००३मध्ये अखेरचा सामना झाला होता. त्यानंतर १४ वर्षांनी हे संघ या मैदानावर भिडणार आहेत. मात्र सध्या तरी ‘सांग सांग भोलानाथ, वनवास संपेल काय’, हीच आशा चाहते करीत आहेत.

स्मिथचे आज एकदिवसीय शतक

लेग-स्पिनर म्हणून कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने २०१५च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्य सामन्यात दडपण झुगारत शतकी खेळी साकारली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मायकेल क्लार्ककडून स्मिथकडे चालत आहे. गेल्या काही वर्षांत खेळ आणि नेतृत्व या दोन्ही बाजूंमध्ये परिपक्व झालेला स्मिथ गुरुवारी आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील शतकी सामना खेळत आहे. ‘‘सिडनी क्रिकेट मैदानावर २०१५च्या विश्वचषकात मी भारताविरुद्ध साकारलेली शतकी खेळी ही माझ्या कारकीर्दीतील सर्वात संस्मरणीय खेळी होती,’’ असे स्मिथने यावेळी नमूद केले.

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, यझुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, उमेश यादव, मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, हिल्टन कार्टराइट, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), नॅथन कोल्टर-नाइल, पॅट कमिन्स, जेम्स फॉल्कनर, पीटर हँड्सकोम्ब, ट्रॅव्हीस हेड, ग्लेन मॅक्सवेल, अ‍ॅडम झम्पा, केन रिचर्ड्सन, मार्कस स्टोइनीस, आरोन फिंच.

  • सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर वाहिनी.