ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारताचा दर्जेदार गोलंदाजीचा मारा आणि सामथ्र्यशाली फलंदाजीच्या फळीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. सामना जिंकण्यासाठीचा पर्यायी आराखडा नसल्यामुळे पहिल्या सामन्याच्याच रणनीतीसह रविवारी होणारा दुसरा एकदिवसीय सामना खेळून भारतीय संघाला मालिकेतील आव्हान टिकवावे लागणार आहे.

धावांचा वर्षांव झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने ६६ धावांनी हार पत्करली. या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना अनेक मुद्दय़ांचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. यापैकी अष्टपैलू खेळाडू हा महत्त्वाचा मुद्दा ठरेल.

२०१७च्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम सामन्याप्रमाणे हार्दिक पंडय़ाने ७६ चेंडूंत ९० धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पण हार्दिकला जसे भारताला जेतेपद मिळवून देता आले नव्हते, तसेच हा सामनाही वाचवता आला नाही. ‘आयपीएल’मधील दुखापतीमुळे पंडय़ा गोलंदाजी करू शकला नाही. येत्या काही महिन्यांत तो दुखापतीतून सावरला नाही, तर आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकातही भारतासाठी ते चिंतेचे कारण ठरेल.