भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका

अ‍ॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका वाचवण्यासाठी विजय अनिवार्य असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सामोरे जाताना महेंद्रसिंह धोनीची फलंदाजी ही भारतापुढील प्रमुख समस्या आहे. मधल्या षटकांमध्ये फलंदाजीचा योग्य वेग राखण्यात तो अपयशी ठरत आहे.

शिस्तभंगामुळे हार्दिक पंडय़ाची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आल्यामुळे भारताच्या फलंदाजीचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ३४ धावांनी पराभव पत्करला. या सामन्यात उपकर्णधार रोहित शर्माची शतकी खेळी अपयशी ठरली.

या सामन्यात धोनीने ५१ धावांच्या खेळीसाठी ९६ चेंडू खर्ची घातले. सोबतच्या फलंदाजासोबतचा ताळमेळ योग्य राखू न शकणाऱ्या धोनीच्या फलंदाजीचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री गांभीर्याने विचार करीत आहेत. धोनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो, मात्र त्याने चौथ्या स्थानावर फलंदाजी करावी, अशी सूचना रोहितने केली होती. परंतु फलंदाजीच्या क्रमवारीत कोणताही बदल केला जाणार नाही, असे भारतीय संघाच्या सराव सत्रानंतर संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. कारण अंबाती रायुडूने आशिया चषक स्पर्धेत आणि मायदेशातील वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत चौथ्या क्रमांकाला पुरेसा न्याय दिला आहे. मोठी खेळी आणि धावांचे सातत्य राखण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरील सलामीच्या सामन्यात भारताच्या फलंदाजीचा क्रम चर्चेत आला. २०१६ पासून रोहित शर्मा, शिखर धवन व विराट कोहली हे आघाडीचे तीन फलंदाज सातत्याने धावा करीत आहेत. त्यामुळे चौथ्या षटकात धोनीने फलंदाजी करण्याची परिस्थिती क्वचितच निर्माण झाली होती.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठीचा अंतिम संघ भारताने निश्चित केलेला नाही. कारण अष्टपैलू विजय शंकर सोमवारी दुपारी अ‍ॅडलेडला दाखल झाला आहे. त्यामुळे तो आगामी सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. आशिया चषक आणि विंडीजविरुद्धच्या मालिकेत भारताने तीन फिरकी गोलंदाजांसह खेळण्यात धन्यता मानली होती. मात्र परदेशातील खेळपट्टय़ांवर पंडय़ाच्या अनुपस्थिती तीव्रतेने जाणवणार आहे.

रायुडूवर वादग्रस्त गोलंदाजीच्या शैलीचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजीची परवानगी देण्यात आली आहे. आता संघव्यवस्थापन त्याला गोलंदाजीची संधी देईल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. भारतीय संघापुढे अष्टपैलू केदार जाधवचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी दिनेश कार्तिकला वगळावे लागणार आहे.

भारताच्या गोलंदाजीच्या माऱ्यात बदल होण्याची शक्यता आहे. खलील अहमद पहिल्या सामन्यात महागडा ठरला होता. सोमवारी त्याने युजवेंद्र चहलसोबत नेटमध्ये फलंदाजीचा सराव केला. मोहम्मद शमीने मात्र टिच्चून गोलंदाजी केली होती. रवींद्र जडेजाच्या अष्टपैलू गुणधर्मामुळे चहलच्या संधीची शक्यता कमी आहे. मोहम्मद सिराजने शास्त्री यांच्या देखरेखीखाली गोलंदाजीचा सराव केला. तो अहमदच्या स्थानासाठी दावेदारी करू शकतो.

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठीसुद्धा आपला संघ घोषित केला नाही. मात्र विजयी संघात ते बदल करण्याची शक्यता कमी आहे. ग्लेन मॅक्सवेलचा फलंदाजीचा क्रम ही त्यांच्यासाठी प्रमुख समस्या आहे.

महेंद्रसिंह धोनी आणि फलंदाजीचे स्थान

सामने ३३३  धावा  १०२२४

क्रमांकानुसार सरासरी

स्थान   धावसरासरी     स्ट्राइक रेट

चौथे      ५२.९५              ९४.२१

पाचवे    ५०.७०              ८६.०८

सहावे    ४६.३३              ८३.२३

एकूण     ५०.११             ८७.६०

धोनीच्या एकूण सरासरीपेक्षा त्याची चौथ्या क्रमांकावरील धावांची सरासरी अधिक आहे. ऑस्ट्रेलियात याआधी जानेवारी २०१६मध्ये धोनी खेळला होता. दोन सामन्यांत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून त्याने एकूण १८ धावा केल्या होत्या. त्या मालिकेपासून फक्त आठ एकदिवसीय सामन्यांत धोनीने चौथ्या स्थानावर फलंदाजी केली आहे. मागील वर्षी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतही तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. ऑक्टोबर २०१६मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याला २४.७५ धावांची सरासरी राखता आली होती. ८० ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्यामुळेच सद्य:स्थितीत त्याला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यासाठी अनुकूलता नाही.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, खलीलल अहमद, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, विजय शंकर.

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरेनड्रॉफ, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पीटर हॅण्ड्सकोम्ब, उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, मिचेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाये रिचर्ड्सन, पीटर सिडल, बिली स्टॅनलेक, मार्क्स स्टॉयनिस, अ‍ॅश्टन टर्नर, अ‍ॅडम झम्पा.

सामन्याची वेळ : सकाळी ८.५० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३