भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगणार आहे. कोलकाता शहरात पावसाचा खेळ सुरु असल्यामुळे दोन्ही संघ सामन्यापूर्वी मैदानावर सराव करु शकले नाहीत. दरम्यान बुधवारी काही वेळासाठी खेळपट्टीवरुन कव्हर हटवण्यात आले होते. मात्र पाऊस सुरु झाल्यामुळे पुन्हा खेळपट्टीवर कव्हर अंथरण्यात आले.

ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने सामन्यापूर्वी खेळपट्टीची पाहणी केली. खेळपट्टीवरील मोठे गवत पाहून तो अवाक् झाला. खेळपट्टीच्या पाहणीनंतर तो म्हणाला की, सध्याच्या घडीला मी खेळपट्टीवर एवढे मोठे गवत पाहिलेले नाही. कदाचित उद्या सामना सुरु होण्यापूर्वी हे गवत कमी करण्यात येईल. सामन्यापूर्वी खेळपट्टीची पाहणी करुनच संघाची निवड केली जाईल, असेही तो यावेळी म्हणाला.

पावसामुळे सरावावर पाणी फेरले असले तरी त्याचा फारसा फरक सामन्यात पडणार नाही, असेही तो म्हणाला. काही दिवसांपूर्वीच सामना झाला आहे. तसेच आम्ही खूप मेहनतही घेतली आहे. त्यामुळे टीम सकारात्मकपणे मैदानात उतरले. चेन्नईतील भारताच्या डावानंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे ऑस्ट्रेलियाला २१ षटकांत १६४ धावांचे आव्हान देण्यात आले होते. कोलकाताच्या मैदानावर पुन्हा पावसाचे सावट आहे. भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून, स्मिथच्या संघापुढे बरोबरी साधण्याचे आव्हान असेल.

यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पांड्या यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने चेन्नईच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने विजयी सलामी दिली. या सामन्यात डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताने २६ धावांनी विजय मिळवला होता. आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर धोनीने अष्टपैलू हार्दिक पांड्यासोबत चांगला खेळ करत भारताचा डाव सावरला होता. त्यानंतर कुलदीप आणि चहल या फिरकीपटूंनी लक्षवेधी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलशिवाय अन्य फलंदाजांना मैदानात तग धरता आला नव्हता.