सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याला उशीरा संधी मिळाली आहे. त्याला दोन वर्षांपूर्वीच भारतीय संघात स्थान मिळायला हवं होतं, असं मत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर यानं व्यक्त केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना आगरकरनं आपली भूमिका मांडली. सतत अपयशी ठरणाऱ्या पृथ्वी शॉची जागी बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शुबमन गिलला संधी देण्यात आली आहे.

शुबमन गिलनं पदार्पणाच्या सामन्यात केलेल्या ४५ धावांच्या खेळीनं सर्वांची मनं जिंकली आहेत. स्टार्क, हेजवूड, कमिन्ससारख्या गोलंदाजांचा संयमी सामना करत गिलनं ४५ धावांची खेळी केली. गिलनं आपल्या छोटेखानी खेळीत ८ चौकार लगावले. शिवाय अनुभवी पुजारासोबत महत्वाची भागिदारीही केली. गिलच्या या खेळीवर भारताचा माजी खेळाडू अजित आगरकर प्रभावित झाला आहे. गिलमध्ये कमालीची प्रतिभा आहे. त्याला दोन वर्षांपूर्वीच संधी मिळायला हवी होती, असं मत आगरकरनं व्यक्त केलं.

इतक्या कमी कालावधीत तुम्हाला असे फटके मारता येत नाहीत. प्रत्येक चेंडूनंतर गिलचा आत्मविश्वासही वाढलेला दिसत होता. गिलला खूप दिवसानंतर संधी मिळाली आहे. त्यानं मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे. या छोटेखानी खेळीदरम्यान त्याला जिवनदानही मिळालं. आशा आहे की आपला हाच फॉर्म तो यापुढेही ठेवेल, असं आगरकर म्हणाला.

मेलबर्न येथे सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शुबमन गिलसोबत मोहम्मद सिराजनेही पदार्पण केलं आहे. सिराजनं पहिल्या डावात गोलंदाजी करताना दोन महत्वाचे बळी घेतले आहेत. तर गिलनं पदार्पणाच्या सामन्यात ४५ धावांची खेळी केली.