ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेरीस सावध सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर संपवल्यानंतर टीम इंडियाने दिवसाअखेरीस १ बाद ३६ पर्यंत मजल मारली. दिवसाअखेरीस नवोदीत शुबमन गिल नाबाद २८ तर चेतेश्वर पुजारा नाबाद ७ धावांवर खेळत होता. ऑस्ट्रेलियाकडे पहिल्या डावात अजुनही १५९ धावांची आघाडी आहे. सलामीवीर मयांक अग्रवाल दुसऱ्या कसोटी सामन्यातही शून्यावर माघारी परतला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला नंतर पश्चाताप करावा लागला. जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन आश्विन यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं. मार्नस लाबुशेन आणि ट्रॅविस हेड यांचा अपवाद वगळता एकही ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजीचा सामना करु शकला नाही. लाबुशेनने ४८ तर हेडने ३८ धावा केल्या. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने ४, आश्विनने ३ तर पदार्पणाचा कसोटी सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजनेही २ बळी घेत आपली चमक दाखवली.

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल पहिल्याच षटकात स्टार्कच्या गोलंदाजीवर एकही धाव न काढता माघारी परतला. पहिल्याच षटकात बसलेल्या या फटक्यामुळे टीम इंडिया बॅकफूटवर गेली. परंतू शुबमन गिलनेही काही सुरेख फटके खेळत संघावरचं दडपण कमी केलं. ३८ चेंडूत २८ धावांच्या खेळीत गिलने ५ चौकार लगावले. दुसऱ्या बाजूने पुजारानेही त्याला उत्तम साथ दिली. अखेरच्या सत्रांत फारशी जोखीम न स्विकारता भारतीय फलंदाजांनी षटकं खेळून काढत १ बाद ३६ वर पहिल्या दिवसाचा खेळ संपवला.