आज तिसरा एकदिवसीय सामना जिंकण्याचा भारताचा निर्धार

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचे ऐतिहासिक यश भारताने संपादन केले आहे. आता या भूमीवर प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकून दौऱ्याची विजयी सांगता करण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे. उभय संघांमधील निर्णायक सामना शुक्रवारी होणार आहे.

सिडनीमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३४ धावांनी विजय मिळवला, तर अ‍ॅडलेडला भारताने सहा गडी राखून विजय साजरा केला. त्यामुळे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साधली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताला अद्याप एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही. परंतु एकदिवसीय प्रकारातील दोन महत्त्वाच्या स्पर्धा येथे भारताने जिंकून दाखवल्या आहेत. १९८५मध्ये क्रिकेट विश्व अजिंक्यपद आणि २००८ मध्ये सीबी सीरिज स्पर्धा भारताने जिंकल्या आहेत. २०१६ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियात अखेरची एकदिवसीय मालिका खेळला होता. त्यावेळी भारताने १-४ अशी हार पत्करली होती.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताने ट्वेन्टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. मग कसोटी मालिकेत २-१ असा ऐतिहासिक विजय संपादन केला. आता मेलबर्नला तिसरा एकदिवसीय सामना जिंकल्यास भारताला ऑस्ट्रेलियामधील दौऱ्यावर तिन्ही मालिकांमध्ये अपराजित राहता येईल.

भारतीय संघाला पाचव्या गोलंदाजाच्या पर्यायाची चिंता तीव्रतेने भेडसावत आहे. या मालिकेत आतापर्यंत भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी आपली जबाबदारी चोख बजावली आहे. डावखुरे फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनीही मधल्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांना नियंत्रणात ठेवण्याचे कार्य उत्तम केले आहे. हार्दिक पंडय़ाच्या अनुपस्थितीत भारताला सिडनी आणि अ‍ॅडलेडला वेगवान गोलंदाज हा पाचवा गोलंदाजीचा पर्याय वापरावा लागला आहे. अंबाती रायुडूकडे पुन्हा चेंडू देण्याविषयी विराट कोहली इच्छुक नाही. खलील अहमद (०/५५) आणि मोहम्मद सिराज (०/७६) आपला प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले आहेत. वेगवान गोलंदाजीचा पर्याय उपलब्ध असणारा अष्टपैलू विजय शंकर आणि लेग स्पिनर युजवेंद्र चहल हेसुद्धा स्पध्रेत आहेत. शंकर पंडय़ाची जागा भरू शकेल. पण १० षटके गोलंदाजीसाठी शंकरचा पर्याय भारतीय संघ व्यवस्थापनाला अद्याप विश्वासार्ह वाटत नाही.

जर कोहलीने शंकरला एकदिवसीय पदार्पणाची संधी दिली, तर भारताचा सुनिश्चित फलंदाजीचा क्रम बिघडेल. त्यामुळे केदार जाधवला संघात स्थान मिळू शकेल. या स्थितीत पाचव्या गोलंदाजाची १० षटके जाधव आणि शंकर हे दोघे गोलंदाजी करू शकतील. मात्र अंबाती रायुडू किंवा दिनेश कार्तिक यापैकी एक जण संघाबाहेर जाईल. दुसऱ्या सामन्यात कार्तिकने विजयात उपयुक्त भूमिका पार पाडली होती, तर रायुडू हा चौथ्या क्रमांकासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

पहिल्या दोन सामन्यांचाच फलंदाजीचा क्रम तिसऱ्या सामन्यातसुद्धा भारत राखणार आहे. दोन सलग अर्धशतकांसह अ‍ॅडलेडच्या विजयात सिंहाचा वाटा उचलून महेंद्रसिंह धोनीने तूर्तास टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.

ऑस्ट्रेलियाला प्रमुख चिंता आरोन फिंच आणि अ‍ॅलेक्स केअरी यांच्या सलामीची आहे. त्यांची मधली फळीसुद्धा मागील दोन सामन्यांत चांगली कामगिरी करीत आहे. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यासाठी दोन बदल केले आहेत. ऑफ-स्पिनर नॅथन लायनच्या जागी लेग-स्पिनर अ‍ॅडम झम्पाला संघात स्थान दिले आहे, तर वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनड्रॉफने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्याच्या जागी बिली स्टॅनलेकला संधी मिळाली आहे. परंतु अष्टपैलू मिचेल मार्शला पुन्हा डावलण्यात आले आहे.

  • मेलबर्नवर उभय संघांमध्ये १४ एकदिवसीय सामने झाले आहेत. यापैकी भारताने ५ आणि ऑस्ट्रेलियाने ९ सामने जिंकले आहेत. भारताने २००८ मध्ये या मैदानावर अखेरचा एकदिवसीय सामना जिंकला होता.
  • शिखर धवनला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी ३३ धावांची आवश्यकता आहे.
  • मोहम्मद शमीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० बळींचा टप्पा गाठण्यासाठी तीन फलंदाजांना बाद करण्याची आवश्यकता आहे.

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, विजय शंकर.

ऑस्ट्रेलिया (अंतिम ११) : आरोन फिंच (कर्णधार), अ‍ॅलेक्स केअरी (यष्टिरक्षक), पीटर हँड्सकोम्ब, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाये रिचर्ड्सन, पीटर सिडल, बिली स्टॅनलेक, मार्कस स्टॉयनिस, अ‍ॅडम झम्पा.

  • सामन्याची वेळ : सकाळी ७.५० वाजल्यापासून.
  • थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३.