17 December 2017

News Flash

निर्णायकी!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-२० सामना आज

पीटीआय, हैदराबाद | Updated: October 13, 2017 2:28 AM

विराट कोहली ( संग्रहीत छायाचित्र )

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-२० सामना आज

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका एका रंजकदार वळणावर येऊन ठेपली आहे. जो संघ शुक्रवारी होणारा तिसरा सामना जिंकेल, त्याला मालिका विजय मिळवता येईल. त्यामुळेच हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.

गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलियापुढे भारतीय संघ धारातीर्थी पडल्याचे पाहायला मिळाले होते. भारताचे फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या जेसन बेहरेन्डॉर्फच्या भेदक वेगवान गोलंदाजीपुढे नतमस्तक झाले. त्यामुळे या सामन्यात जेसनच्या गोलंदाजीचा सामना भारतीय फलंदाज कसा करतात, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

गेल्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या चारही फलंदाजांना जेसनमुळे झटपट तंबूचा रस्ता धरावा लागला होता आणि या धक्क्यातून त्यांना सावरता आले नव्हते. त्यामुळे या सामन्यात हे चार आघाडीचे फलंदाज कशी कामगिरी करतात, हे पाहावे लागेल. त्याचबरोबर केदार जाधव आणि हार्दिक पंडय़ा यांना स्थिरस्थावर झाल्यावरही मोठी खेळी साकारता येत नाही, याचा विचार संघ व्यवस्थापनाला करावा लागेल. महेंद्रसिंग धोनीकडून यष्टिरक्षण अव्वल दर्जाचे होत असले तरी या मालिकेत त्याला फलंदाजीत सूर सापडलेला दिसत नाही. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल यांच्याकडून सातत्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळत असली तरी त्यामध्ये अजून धार येणे अपेक्षित आहेत.

विजयामुळे ऑस्ट्रेलियाचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल आणि याचा फायदा त्यांना मालिका विजय मिळवण्यासाठी नक्कीच होऊ शकतो. जेसन चांगल्या फॉर्मात आला आहे, त्याला नॅथन कोल्टर-नाइलची चांगली साथ मिळत आहे. फिरकीपटू अ‍ॅडम झम्पाही अचूक मारा करत आहे. ऑस्ट्रेलियाला चिंता असेल ती फलंदाजीची. कारण त्यांच्या फलंदाजीमध्ये सातत्य पाहायला मिळालेले नाही. डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅरोन फिंच ही अनुभवी सलामी जोडी ऑस्ट्रेलियाकडे आहे, पण या दोघांनाही आतापर्यंत मोठी सलामी देता आलेली नाही. या दोघांपैकी एक फलंदाज जरी तळपला तर ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता येऊ शकतो. गेल्या सामन्यात ट्रेव्हिस हेड व मोइसेस हेन्रिक्स यांनी धडाकेबाज फलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखवून दिले होते. त्यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची संघाला अपेक्षा असेल. ग्लेन मॅक्सवेलला अजूनही सूर गवसलेला नाही आणि हीच ऑस्ट्रेलियासाठी चिंतेची बाब आहे.

दोन्ही संघ चांगलेच तुल्यबळ आहेत; पण ज्या संघाचे मनोबल उंचावलेले असेल आणि जो संघ आत्मविश्वासपूर्ण खेळ करेल, त्यालाच विजय मिळेल.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांडय़ा, महेंद्रसिंग धोनी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, आशीष नेहरा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जेसन बेहरेन्डॉर्फ, डॅन ख्रिस्तियन, नॅथन कोल्टर-नाइल, पॅट कमिन्स, अ‍ॅरोन फिंच, ट्रेव्हिस हेड, मोइसेस हेन्रिक्स, ग्लेन मॅक्सवेल, टीम पेन, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झम्पा, अँड्र्य़ू टाय.

सामन्याची वेळ : संध्याकाळी ७ वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी.

First Published on October 13, 2017 2:28 am

Web Title: india vs australia 3rd t20