India vs Australia 3rd Test Day 3 : चांगल्या सुरुवातीनंतरही फलंदाजांनी केलेल्या हराकिरीमुळे भारतीय संघाचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला. चेतेश्वर पुजारा (५०) आणि शुबमन गिल (५०) यांचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्मा (२६), अजिंक्य रहाणे (२२) आणि ऋषभ पंत (३६) यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. रविंद्र जाडेजानं अखेरीस काही अप्रतिम फटके मारत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. जाडेजानं नाबाद २८ धावांची खेळी केली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडे ९४ धावांची आघाडी आहे.
भरातीय फलंदाजांनी हराकिरी केल्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलिया संघानं वर्चस्व मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघानं अफलातून क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन केलं. कांगारुंनी भारताच्या तीन फलंदाजांना धावबाद केलं. यामध्ये हनुमा विहारी(४), आर. अश्विन (१०)आणि जसप्रीत बुमराह (००) यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं सर्वाधिक चार बळी घेतले आहेत. तर हेजलवूडनं दोन भारतीय फलंदाजांना माघारी धाडलं. तर स्टार्कला एक विकेट मिळाली.
तिसऱ्या दिवसाचा खेळाला सुरुवात झाल्यानंतर कमिन्सच्या सुरेख चेंडूवर अजिंक्य रहाणे क्लीन बोल्ड झाला. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर भारतीय संघाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. पंत-पुजारा यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नव्या चेंडूवर हेजलवूडनं पंतला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर पुजाराही लगेच बाद झाला. त्यामुळे एकवेळ चांगल्या स्थितीत असणाऱ्या भारतीय संघाचा डाव कोसळला अन् ऑस्ट्रेलियानं सामन्यावर पकड मिळवली.
What a session for Australia!
They have bowled India out for 244 and it’s time for a tea break #AUSvIND scorecard https://t.co/Zuk24dsH1t pic.twitter.com/a0iGTa7BYt
— ICC (@ICC) January 9, 2021
दोन्ही संघाच्या फलंदाजीत काय फरक? –
ऑस्ट्रेलियाकडून १०० धावांच्या दोन मोठ्या भागिदारी झाल्या. लाबुशेन-पुलोव्हस्की आणि स्मिथ-लाबुशेन यांच्यामध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी १०० धावांच्या भागिदारी झाल्या.मात्र, भारतीय फलंदाजांना एकही मोठी भागिदारी करता आली नाही. रोहित शर्मा-शुबमन गिल यांच्यात झालेली ७० धावांची भागिदारी भारताची सर्वात मोठी भागिदारी होती. त्यानंतर पंत-पुजारा यांच्यात झालेली ५३ धावांची भागिदारी दुसऱ्या क्रमांकाची मोठी भागिदारी होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 9, 2021 9:47 am