अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वर कुमार यांच्या झुंजार फलंदाजीमुळे भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची सिडनी कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळाले. रहाणे आणि भुवनेश्वर कुमार यांनी ३५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत भारताचा पराभव टाळला. भारतीय डावाची पडझड सुरू असताना अजिंक्य रहाणेने ८८ चेंडूत ३८ धावांची झुंजार खेळी करत खेळपट्टीवर एक बाजू लावून धरली. तर, आर.अश्विन बाद झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारने रहाणेला योग्य साथ देत भारताचा पराभव टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. चार कसोटी सामन्यांची ही मालिका ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच २-० अशी खिशात घातली होती.
तत्पूर्वी कसोटीच्या अखेरच्या दिवशी चांगली धावसंख्या उभारल्यानंतर पुन्हा एकदा भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना दिसला. मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी १७४ धावांची भागीदारी करत संघाला ३ बाद १७८ अशा सुस्थितीत नेऊन ठेवले होते. मात्र, मुरली विजय आणि कोहली बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेला सुरेश रैना आणि वृद्धिमान साहा भोपळाही न फोडता माघारी परतल्याने भारतीय संघापुढे पराभावचे संकट उभे ठाकले होते.
ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव आदल्या दिवशीच्याच ६ बाद २५१ धावांवर घोषित केला आणि भारतासमोर विजयासाठी ३४९ धावांचे आव्हान होते. पाचव्या दिवशी या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुरली विजय आणि लोकेश राहुल या सलामीवीरांनी भारतीय डावाची सावध सुरूवात केली. मात्र, नॅथन लायनने लोकेश राहुलला १६ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला रोहित शर्मा आणि मुरली विजय यांनी ५६ धावांची भागीदारी करत संघाला शतकी धावसंख्या ओलांडून दिली. मात्र, उपहारानंतर ३६ धावांवर खेळत असलेल्या रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथने स्लिपमध्ये अप्रतिम झेल पकडला. त्यानंतर मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहली यांनी भारतीय डावाची पडझड होणार नाही याची काळजी घेतली. या संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दिमाखदार फलंदाजी करणाऱ्या मुरली विजयने १६५ चेंडूत ८० धावा केल्या.