ब्रिस्बेन येथे सुरु असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त हनुमा विहारीच्या जागी मयांक अगरवल याला संधी देण्यात आली. भारताच्या युवा गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला ३६९ धावांवर रोखल्यानंतर भारतीय संघाच्या फलंदाजांनी निरशजन खेळी केली आहे. अनावशक फटके मारत खेळाडूंनी विकेट फेकल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मयांकनं ३८ धावांची छोटेखानी खेळी करत आपली विकेट फेकली. या खेळीदरम्यान मयांकनं मारलेल्या उत्तुंग षटकाराची पहिल्या सत्रात चर्चा होती.

१०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लायनच्या चेंडूवर मयांकनं पुढे येऊन खणखणीत षटकार खेचला. मयांकचा हा षटकार तब्बल १०२ मीटर इतका लांब होता. हा षटकार पाहून ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक आणि प्रेक्षकही आवक झाले होते. ५८ व्या षटकांतील दुसऱ्या चेंडूवर मयांकनं लायनला चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला.

पाहा व्हिडीओ –

मयांकनं ७५ चेंडूचा सामना करताना ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं ३८ धावांची छोटेखानी खेळी केली. मात्र, मयांकला चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. ३६९ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाचे पहिल्या डावात आघाडीचे सहा फलंदाज तंबूत परतले आहेत. वॉशिंगटन सुंदर आणि शार्दुल ठाकूर सध्या खेळत असून भारतीय संघ अद्याप १८० धावांनी पिछाडीवर आहे.