ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

एकदिवसीय मालिकेत ३-० असा सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतीय महिला ‘अ’ संघ सोमवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत यश मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे ९ नोव्हेंबरपासून वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठी भारतीय संघात निवडण्यात आलेले खेळाडूच या मालिकेत सहभागी होत असल्याने, या स्पर्धेला विश्वचषकापूर्वी रंगीत तालमीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

पूनम राऊतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारत ‘अ’ संघाला एकदिवसीय मालिकेत सपशेल अपयश आले. मात्र हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेन्टी-२० मालिकेत दमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. मुंबईतील बांद्रा-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे २२, २४ व २६ ऑक्टोबर रोजी हे तीन सामने खेळवण्यात येणार आहेत.

फलंदाजीत भारताची मदार प्रामुख्याने स्मृती मानधना, युवा जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यावर आहे. त्याशियाव हरमनप्रीत व मिताली राजचा अनुभव संघाला फायदेशीर ठरू शकतो. मानसी जोशी, पूनम यादव भारताच्या गोलंदाजीची जबाबदारी हाताळतील.

भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), मिताली राज, जेमिमा रॉड्रिग्ज, वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, तानिया भटिया (यष्टीरक्षक), पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिश्त, डी हेमलता, मानसी जोशी, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी.