बॉग्सिंग डे कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेनं संयमी फलंदाजी करत शतकी खेळी केली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत नेतृत्व करणाऱ्या रहाणेनं कर्णधाराला साजेशी फलंदाजी करताना शतक झळकावलं. मेलबर्न येथे रंगलेल्या कसोटी सामन्यात रहाणेनं १२ चौकारांसह शतकं झळकावलं. कसोटी क्रिकेटमधलं अजिंक्य रहाणेचं हे १२ वं शतक ठरलं. महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवसाच्या खेळात अजिंक्यने हनुमा विहारी, ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजा यांच्यासोबत महत्वपूर्ण भागीदारी करत भारतीय संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या शतकी खेळीसह मुंबईकर रहाणेच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली आहे.

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दोन शतकं झळकावणारा एकमेव भारतीय खेळाडू होण्याचा मान रहाणेच्या नावावर झाला आहे. २०१४ मध्ये झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात रहाणेनं १४७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राहणेनं नाबाद राहत शतकी खेळी केली आहे. १९९९ मध्ये बॉक्संग डे कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरनं शतकी खेळी केली होती. त्याशिवाय सेहवागनं २००३, कोहली २०१४ आणि पुजारा २०१८ मध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शतकी खेळी केली आहे.

मेलबर्न क्रिकेट मैदानावर सर्वाधिक शतक झळकावणाऱ्यामध्ये रहाणे, विनू मंकड यांच्यासह पहिल्या क्रमांकावर आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर रहाणेचं हे दुसरं शतक आहे. गावसकर, कोहली, पुजारा, सेहवाग, सचिन, विश्वनाथ यांनी मेलबर्न क्रिकेट मैदानावर प्रत्येकी एक शतक झळकावलं आहे.


कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियात शतक झळकावणारा रहाणे पाचवा कर्णधार ठरला आहे. विराट कोहलीनं चारवेळा ऑस्ट्रेलियात शतक झळकावली आहेत. २०१४ मध्ये कोहलीनं दोन शतकं झळकावली होती. त्यानंतर २०१५ आणि २०१८ मध्ये कोहलीनं शतकी खेळी केली होती. अजहरनं १९९२, सचिनने १९९९ आणि गांगुलीनं २००३ मध्ये शतकी खेळी केली होती.

अजिंक्य रहाणे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर झळकावलेलं शतक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील रहाणेचं तिसरं शतक ठरलं आहे. याआधी रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल यांनी प्रत्येकी तीन-तीन शतकं झळकावली आहेत.