अॅडिलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीतील मानहानीकारक पराभवातून सावरत असलेल्या भारतीय संघाला दिशा दाखवण्याबरोबरच रहाणेनं फलंदाजीतही छाप पाडली आहे. अजिंक्य रहाणेनं दुसऱ्या सामन्यात संघात चार बदल केले. यामधील सर्वात मोठा बदल विराट कोहलीच्या जागी रविंद्र जाडेजाला संधी देणं हा होता. क्रीडा समिक्षकांपासून चाहत्यांपर्यंत सर्वांना राहुल कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघात खेळेल असं वाटलं होतं. मात्र, राहणेनं रविंद्र जाडेदाला संधी देत मास्टरस्ट्रोक खेळला. रहाणेच्या या डावपेचावर अनेकांनी नाराजीही व्यक्त केली. मात्र जाडेजानं आपल्या अष्टपैलू खेळीमधून सर्वांची बोलती बंद तर केलीच शिवाय रहाणेचा विश्वासही सार्थ ठरवला.

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण खराब होतं. शिवाय फलंदाजांनी आपली कामगिरी अचूक बजावली नव्हती. पहिल्या सामन्यात एकही मोठी भागिदारी पाहायला मिळाली नाही. विराट कोहली वगळता एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलं नव्हतं. दुसऱ्या सामन्यात पहिल्यांदा रहाणेनं शतकी खेळी केली. रहाणेला जाडेजानं संयमी साथ दिली. रहाणे-जाडेजा जोडीनं ऑस्ट्रेलियाचा घाम काढला. रहाणे-जाडेजा यांनी सहाव्या गड्यासाठी १२१ धावांची महत्वाची भागिदारी केली. दोघांच्या भागिदारीच्या बळावर पहिल्या डावात भारतीय संघानं ३२६ धावांपर्यंत मजल मारली.

आणखी वाचा- तुमचा तो बाब्या, आमचं ते…; पेन आणि रहाणेसाठी वेगळा नियम, तिसऱ्या पंचांविरोधात चाहत्यांमध्ये नाराजी

रविंद्र जाडेजानं १५९ चेंडूचा सामना करताना ५७ धावांची महत्वाची खेळी करत संघाची धावसंख्या वाढवली. याशिवाय पहिल्या डावात गोलंदाजी करताना जाडेजानं एक विकेटही घेतली. तसेच एक उत्कृष्ट झेलही घेतला. दुसऱ्या डावांत गोलंदाजी करताना उमेश यादवनं दुखापतीमुळे मैदान सोडलं होतं. भारतीय संघ अडचणीत असताना सर जाडेजानं पुन्हा एकदा कमाल दाखवली. दुसऱ्या डावांत गोलंदाजी करताना जाडेजानं १० षटकांत २५ धावा देत दोन महत्वाच्या विकेट घेतल्या. जाडेजानं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि मॅथ्यू वेड यांना माघारी धाडलं.

Video : बुम बुम बुमराह; क्लीन बोल्ड झाला पण स्मिथला कळलंच नाही

कर्णधार अजिंक्य रहाणेनं दाखवलेला विश्वास रविंद्र जाडेजानं सार्थ केला आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात जाडेजानं आपलं योगदान दिलं आहे. राहुल ऐवजी जाडेजाला खेळवण्याचा रहाणेचा मास्टरस्ट्रोक यशस्वी ठरला आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघानं सहा गड्यांच्या मोबदल्यात १२१ धावा केल्या आहेत. चार विकेट अद्याप बाकी आहेत त्यामुळे जाडेजा आणखी किती बळी मिळवण्यात यशस्वी ठरतोय पाहूयात…