अॅडिलेड येथे पहिल्या कसोटी झालेल्या मानहानीकारक पराभवाबाबत अद्याप चर्चा सुरु आहे. पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेकडून जम बसलेला विराट कोहली धावबाद झाला होता. विराट कोहली धावबाद झाल्यानंतर भारतीय संघाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांची जोडी जमली होती. त्यावेळी संघाची धावसंख्या १८८ होती. ही जोडी आजचा दिवस खेळून काढणार असं वाटत असतानाच ७४ धावांवर खेळणारा विराट कोहली रहाणेच्या चुकीमुळे धावबाद झाला. विराट कोहली धावबाद झाल्यानंतर भारतीय संघानं फक्त ४८ धावांची भर घातली. विराट कोहलीनंतर सहा खेळाडूला फक्त ४८ धावा जोडता आल्या. रहाणेची ती चूक सामन्याचा निर्णायक क्षण ठरला. या चुकीवर विराट कोहलीची माफी मागितल्याचं रहाणेनं सांगितलं आहे.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलाताना रहाणेनं विराट कोहलीच्या धावबाद प्रतिक्रिया दिली. रहाणे म्हणाला की, ‘पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मी त्याच्याकडे (विराट) गेलो आणि त्याची माफी मागितली. मात्र, तो ती गोष्ट विसरला होता. त्यावेळी नेमकी कोणती परिस्थिती निर्माण झाली होती, याची आम्हाला जाणीव होती. अशा गोष्टी क्रिकेटमध्ये घडतात याची आम्हाला जाणीव आहे. हे सत्य स्विकारुनच तुम्हाला पुढं जायला हवं.’

मायदेशी परतण्यापूर्वी विराट कोहलीने भारतीय संघाला खास संदेश देत मनोबल उंचवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती रहाणेनं पत्रकार परिषदेत दिली. तो म्हणाला की, ‘उर्वरित सामन्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचा सल्ला त्याने दिला. तसेच प्रत्येकाने आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून एकजूट होऊन खेळावे, जे संघ म्हणून गेली काही वर्षे सातत्याने करत आहोत. तेच यापुढेही करायला हवं.’

पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली मायदेशी परतला आहे. त्यामुळे भारतीय संघाचं नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे. अजिंक्य रहाणेनं आतापर्यंत नेतृत्व केलेल्या सर्व कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. मात्र, ते सामने मायदेशी होते. अजिंक्य रहाणे पहिल्यांदाच विदेशात भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.