प्रकाशझोतात कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. २०१५ पासून आतापर्यंत ऑस्ट्रेलिया दिवसरात्र कसोटी सामन्यात अजिंक्य आहे. पहिल्या दिवसरात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा हा पराक्रम मोडण्याची भारतीय संघाला संधी होती. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळली. ऑस्ट्रेलियानं भारताचा ८ गड्यांनी पराभव केला. २०१५ पासून आंतरराष्ट्रीय पातळीवर दिवसरात्र सामन्याचं आयोजन करण्यात आलं. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा पराभव करत यशस्वी सुरुवात केली. २०१५ पासून झालेल्या लागोपाठ ८ दिवसरात्र सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ अजिंक्य आहे.

दिवसरात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि भारताचा पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघाचा प्रत्येकी दोन-दोन वेळा पराभव केला आहे. दिवसरात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कनं सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव करत आपलं वर्चस्व कायम राखलं आहे.

८ गडी राखून भारतावर मात करत ऑस्ट्रेलियाने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक माऱ्यापुढे भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने आपली निच्चांकी धावसंख्याही यादरम्यान नोंदवली. विजयासाठी मिळालेलं ९० धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केलं. मॅथ्यू वेड आणि बर्न्स यांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. जो बर्न्सने नाबाद ५१ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.