अझलन शाह चषक हॉकी स्पध्रेत विजेतेपदाच्या शर्यतीतून जरी भारतीय संघ बाहेर पडला असला तरी मायदेशी परतताना शेवट गोड करण्याची संधी त्यांना असेल. परंतु साखळीतील अखेरच्या लढतीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे खडतर आव्हान आहे.
अझलन शाह चषक स्पर्धेनिशी पॉल व्हान अ‍ॅस यांनी भारताच्या प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारली आहे. याशिवाय रिओ ऑलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टीने या स्पध्रेकडे पाहिले जात आहे. परंतु सध्याच्या कामगिरीकडे पाहता ऑलिम्पिकमधील स्पर्धात्मक आव्हानाला सामोरे जाताना भारताला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. गेल्या वर्षी इन्चॉन आशियाई क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदक जिंकल्यामुळे भारताला ऑलिम्पिक स्पध्रेत थेट प्रवेश मिळाला आहे. अझलन शाह स्पध्रेतील चार सामन्यांत एक विजय आणि एका बरोबरीमुळे खात्यावर फक्त चार गुण जमा झालेल्या भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. तथापि, गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने चारपैकी चार सामने जिंकत झोकात अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.