ऑस्ट्रेलियाविरोधातील ऐतिहासिक विजयानंतर संघाचं नेतृत्व करणाऱ्या मराठमोठ्या अजिंक्य रहाणेवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व केलेल्या अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिका जिंकत इतिहासात नोंद केली आहे. भारतीय संघाने तीन गडी राखत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि २-१ ने मालिका खिशात घातली. गाबाच्या मैदानावर १९८८ नंतर पहिल्यांदाचा ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या जबरदस्त विजयानंतर अजिंक्य रहाणे आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मराठीत उत्तर दिलं आहे.

भारताच्या पराभवाचं भाकीत वर्तवणाऱ्या क्लार्क, पाँटिंग, वॉला आनंद महिंद्रांचा टोला; म्हणाले…

विजयानंतर अजिंक्य रहाणे आणि रवी शास्त्री यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी त्यांना मराठीत प्रश्न विचारत प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना अजिंक्य रहाणेने सांगितलं की, “आजच्या अश्रूंची चव एकदमच गोड होती. फारच बरं वाटलं. स्वत:वर कसं नियंत्रण ठेवू हेच कळत नव्हतं. जे झालं आहे त्यावर विश्वासच बसत नाही, यासाठी कदाचित थोडा वेळ लागेल”.

विराटनं रचला पाया, अजिंक्यनं चढवला कळस – रवी शास्त्री

“सर्वांनीच खूप चांगली कामगिरी केली. खासकरुन पदार्पण करणाऱ्यांनी खूप चांगली खेळी केली. शार्दुलची दुसरी मॅच होती, सिराज आणि सैनीचीही दुसरी-तिसरी मॅच होती. ज्याप्रकारे मैदानात उतरून आपल्या देशासाठी सामना जिंकण्याच्या हेतूने खेळले त्यातून त्यांनी यासाठी तुम्ही ५०, ६०, १०० सामने खेळण्याची गरज नाही, १-२ सामने खेळला असाल आणि तुमच्यात जिद्द असेल तर तुम्ही काहीही करु शकता हे दाखवून दिलं. त्यामुळे या खेळाडूंसाठी मी फार खूश आहे,” अशा शब्दांत अजिंक्य रहाणेने कौतुक केलं.

पुजाराच्या खेळीवर बोलताना अजिंक्य रहाणेने सांगितलं की, “पुजारा ज्या पद्धतीने खेळला त्याने दाखवून दिलं. अनेक बाऊन्सर त्याच्या अंगाला, हेल्मेटला लागले, पण काही फरक पडला नाही. मला विकेटवर उभं राहायचं आहे हे त्याने ठरवलं होतं. यामुळे पंतला खेळणं सोपं झालं. तो मोकळेपणाने खेळू शकला. पुजारा बाद झाल्यानंतर वॉशिंग्टनने चांगल्या पद्दतीने बॅटिंग केली. विजयाचं श्रेय सर्वांनाच जातं. पुजारा आणि आणि पंतला खासकरुन जास्त श्रेय जातं,” असं अजिंक्य रहाणेने सांगितलं. रवी शास्त्री यांनी यावेळी पुजारा आमच्या संघाचा लढवय्या खेळाडू आहे अशा शब्दांत त्याचं कौतुक केलं.