दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघातील दिग्गज फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. मात्र, तळाशी असलेल्या जसप्रीत बुमराहच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघ १९४ धावांपर्यंत पोहचला. जसप्रीत बुमराहने विशेषकरुन आक्रमक पवित्रा घेत अर्धशतक झळकावलं. ५७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह त्याने नाबाद ५५ धावा केल्या. सिराजनेही २२ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली.

४५ व्या षटकात कॅमरुन ग्रीनचा चेंडू बुमराहनं समोरच फटकावला. बुमराहनं मारलेला हा फटका कॅमरुन ग्रीनच्या थेड तोंडावर लागला. चेंडू इतक्या वेगानं होता की ग्रीन जमीनीवर कोसळला. नॉन स्ट्रइकला असलेल्या सिराजनं बॅट टाकून लगेच ग्रीनकडे धाव घेतली. सिराजनं ग्रीनला धीर देत विचारपूस केली. या प्रसंगातून कॅमरुन थोडक्यात बचावला.

सिरजच्या खिलाडूवृत्तीचं सौशल मीडियावर कौतुक होत आहे. बीसीसीआयनेही ट्विटर कर सिराजचं कौतुक केलं आहे.


दरम्यान, दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय खेळाडू सपशेल अपयशी ठरले आहेत. विराट कोहली, चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने निराशाजनक खेळी केली. मयांक अग्रवाल अबॉटच्या गोलंदाजीवर २ धावा काढून माघारी परतला. यानंतर पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे टीम इंडिया संकटात सापडली होती. अखेरीस जसप्रीत बुमराहने अर्धशतकी खेळी करत संघाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला.

हनुमा विहारी, शुबमन गिल, रहाणे, पंत, साहा, नवदीप सैनी हे फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. ३ बाद १०२ वरुन टीम इंडियाची अवस्था ९ बाद १२३ अशी झाली. अखेरीस जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी अखेरच्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाची लाज वाचवली.ऑस्ट्रेलियाकडून सेन अबॉट आणि जॅक वाईल्डरमथने प्रत्येकी ३-३ तर कॉनवे, सदरलँड, ग्रीन आणि स्वेप्सन यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.