ऋषिकेश बामणे – response.lokprabha@expressindia.com

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेला आता सुरुवात झाली असून ऑस्ट्रेलियात विजयी पताका फडकावण्यासाठी सज्ज असलेल्या विराटसेनेला प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या कांगारूंपासून सावध राहावे लागणार आहे.

‘ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कधीच आपले मित्र बनू शकत नाही!’ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २०१७ मधील कसोटी मालिकेनंतर असे भाष्य करणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीला यंदा कांगारूंना त्यांच्याच भूमीत धूळ चारण्याची नामी संधी चालून आली आहे.

मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात चेंडूशी फेरफार केल्यामुळे कर्णधार स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांना एक वर्षांच्या निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणामुळे डागाळलेल्या प्रतिमेला सुधारण्यासाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक असली तरी स्मिथ व वॉर्नरच्या अनुपस्थितीत त्यांचा संघ भारताच्या तुलनेत कमकुवतच वाटत आहे.

भारतासमोरील आव्हानांचा विचार केल्यास सर्वप्रथम प्रश्न उद्भवतो तो म्हणजे सलामीवीर कोण? वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पणातच धडाकेबाज शतक ठोकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळवणाऱ्या पृथ्वी शॉ याला सराव सामन्यात घोटय़ाला दुखापत झाल्याने तो पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. मात्र याच सामन्यातील दुसऱ्या डावात झुंजार शतक ठोकून फॉर्मात परतणाऱ्या मुरली विजयचा संघातील प्रवेश पक्का मानला जात आहे. विजयसह सलामीला संघ व्यवस्थापन कोणत्या फलंदाजास पाठवते, हे पाहणे रंजक ठरेल. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचे इमले रचणारा रोहित शर्मा, या वर्षी प्रथम क्षणी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा हनुमा विहारी व प्रतिभावंत फलंदाज लोकेश राहुल हे तिघे सलामीचे स्थान पटकावण्याच्या शर्यतीत आहेत.

२०१४-१५ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील चार कसोटी सामन्यांत तब्बल चार शतकांसह ६९२ धावा करून भारतीय संघाच्या फलंदाजीची धुरा समर्थपणे वाहणाऱ्या कोहलीवरच साहजिकपणे या दौऱ्यातही अतिरिक्त भार असणार आहे. ‘‘मात्र एक फलंदाज तुम्हाला फक्त एखादा सामना जिंकवून देऊ शकतो, मालिका नव्हे.’’ माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अ‍ॅडम गिलख्रिस्टने एका आठवडय़ापूर्वी व्यक्त केलेले हे मत विराट व त्याच्या सेनेला चांगल्या कामगिरीसाठी नक्कीच उद्युक्त करेल. एका बाजूने खेळपट्टीवर ठाण मांडणाऱ्या कोहलीला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली, तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे काही खरे नाही, हे सर्वानाच ठाऊक आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतदेखील कोहली वगळता भारताच्या अन्य कोणासही पाच कसोटींतून ३०० धावांचा टप्पा गाठता आला नाही. कोहलीने दोन शतके व तीन अर्धशतकांच्या साहाय्याने तब्बल ५९३ धावा केल्या. मात्र तरीही भारतावर ४-१ अशा फरकाने मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली.

मधल्या फळीत कोहलीसह चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांच्यावर भारताची प्रामुख्याने भिस्त राहणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुजाराने प्रत्येकी एक शतक व अर्धशतकासह २७८ धावा केल्या होत्या. मात्र ऑस्ट्रेलियातील त्याची कामगिरी समाधानकारक नाही. हनुमा विहारीला सलामीला संधी न मिळाल्यास त्याला मधल्या फळीत स्थान मिळू शकते. मात्र यासाठी त्याची रोहितशी स्पर्धा असणार आहे. दुसरीकडे जानेवारी महिन्यातील आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींत अपयशी ठरलेला रोहित त्यानंतर प्रथमच विदेशी दौऱ्यावर जात आहे. त्यामुळे या वेळी तरी तो उत्तम प्रदर्शन करेल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.

यंदाच्या दौऱ्याकरिता भारतासाठी सर्वाधिक सकारात्मक बाब म्हणजे सक्षम वेगवान मारा. आतापर्यंत फक्त फलंदाजीसाठी ओळखला जाणाऱ्या भारतीय संघात सध्या एकापेक्षा एक वेगवान व प्रतिभावान गोलंदाजांचा समावेश असून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या तोडीस तोड कामगिरी करण्याची कुवत आपल्या गोलंदाजांमध्ये नक्कीच आहे. जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा अशी वेगवान गोलंदाजांची फळी भारताच्या ताफ्यात असून त्यांना साथ देण्यासाठी रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा व कुलदीप यादव हे फिरकी त्रिकूटदेखील सज्ज आहे. हार्दकि पंडय़ा दुखापतग्रस्त असल्याने पाचव्या गोलंदाजासह अष्टपलू खेळाडूची भूमिका कोण पार पाडणार, हेसुद्धा महत्त्वाचे ठरेल. मात्र ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टाक, जोश हेजलवुड व नॅथन लायन यांच्याविरुद्ध भारतीय गोलंदाजांची कडवी झुंज पाहण्यास सर्वच आतुर आहेत.

सराव सामन्यात भारतीय गोलंदाजांनी क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादशपुढे नांगी टाकली. विशेष म्हणजे त्यांचा संपूर्ण संघ बाद करण्यासाठी कोहलीलादेखील गोलंदाजी करावी लागली. त्यामुळे सराव सामन्याच्या निमित्ताने भारताला मालिकेपूर्वीच धोक्याची घंटा मिळाली असून यात आता ते कशा प्रकारे सुधारणा करतात, यावरच मालिकेचा निकाल ठरेल.

ऑस्ट्रेलियन संघावर नजर टाकल्यास त्यांच्यापुढील असंख्य आव्हानांची जाणीव होईल. टिम पेनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाची फलंदाजीत प्रमुख मदारही आरोन िफच, उस्मान ख्वाजा आणि शॉन व मिचेल या मार्श बंधूंवर आहे.

गोलंदाजी हे कांगारूंचे बलस्थान असून हेझलवूड, स्टार्क व पॅट कमिन्स भारतीय फलंदाजांना हैराण करू शकतात. स्मिथ व वॉर्नरच्या अनुपस्थितीत कांगारूंचा संघ अधिक पेटून उठण्याची शक्यता आहे. त्याशिवाय नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यांनी कडवी झुंज दिली होती. म्हणूनच भारताला आक्रमकतेशिवाय सावध खेळ करण्याचीही आवश्यकता आहे.

एकूणच सर्व बाबींवर लक्ष केंद्रित केल्यास भारतीय संघाचे पारडे कागदावर तरी जड भासते आहे. घरच्या मदानावर खेळण्याचा लाभ ऑस्ट्रेलियाला नक्कीच मिळेल, यात शंका नाही. मात्र यंदा संपूर्ण जोमात असलेल्या विराटसेनेपुढे कांगारूंना विजयासाठी अथक परिश्रम करावे लागणार, हे निश्चित.

अनुभवी पार्थिव की युवा पंत?

दुखापतीमुळे ग्रस्त असलेला वृद्धिमान सहा, संघातून वगळण्यात आलेला दिनेश काíतक यांच्या अनुपस्थितीत या कसोटी मालिकेत यष्टिरक्षक म्हणून कोणाला खेळवावे, हा कठीण प्रश्न कोहलीला भेडसावत आहे. २००२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असणारा पाíथव पटेल व यंदा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेद्वारे पदार्पण करणारा ऋषभ पंत हे दोन पर्याय कोहलीसमोर आहेत. सहाच्या अनुपस्थितीत आफ्रिकेविरुद्ध पाíथवने ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. मात्र इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटींत काíतक अपयशी ठरल्याने पाíथवऐवजी पंतला प्रथमच यष्टिरक्षणाची धुरा सोपवण्यात आली. त्यानेही आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत मालिकेतील पाचव्या सामन्यात कारकीर्दीतील पहिलेवहिले शतक झळकावले, त्याशिवाय यष्टिरक्षणही बऱ्यापकी केले. महेंद्रसिंग धोनीचा अनुयायी म्हणून पंतकडे पाहिले जात असल्याने त्यालाच संघात स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे २२ वर्षीय पंत गोलंदाजांना पोषक असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ांवर कशा प्रकारे कमाल दाखवतो, याकडे संघ व्यवस्थापनाचीदेखील नजर आहे.

तुम्हाला हे माहीत आहे का?

१९९० माजी फलंदाज सुनील गावस्कर व अ‍ॅलन बॉर्डर यांच्या नावावरून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेस १९९० पासून ‘बॉर्डर-गावस्कर करंडक’ या नावाने ओळखले जात असून आतापर्यंत १३ वेळा ही मालिका खेळण्यात आली आहे.

7 भारताने आतापर्यंत सात वेळा बॉर्डर-गावस्कर करंडकावर नाव कोरले आहे, तर ऑस्ट्रेलियाला फक्त पाच वेळा अशी कामगिरी करता आली आहे.

0 भारताने अद्याप एकदाही ऑस्ट्रेलियावर त्यांच्याच मदानात मालिका विजय मिळवला नसून २००३-०४ ची ऑस्ट्रेलियातील मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवण्यात भारताला यश आले होते.

2-1 सध्या बॉर्डर-गावस्कर करंडक भारताकडे असून

२०१६-१७ मध्ये भारतात झालेल्या मालिकेत विराटसेनेने कांगारूंना

२-१ असे पराभूत केले होते.
सौजन्य – लोकप्रभा