ब्रिस्बेनच्या ग्राऊंडवर भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. मालिकेचा निकाल निश्चित करणारा हा कसोटी सामना आहे. दुखापतींमुळे भारतीय संघ आपल्या प्रमुख खेळाडूंशिवाय हा कसोटी सामना खेळतोय.

तिसऱ्या सिडनी कसोटीत मोहम्मद सिराज बरोबर वर्णद्वेषी शेरेबाजीचा प्रकार घडला होता. या कसोटी सामन्यातही ब्रिस्बेनच्या मैदानावर मोहम्मद सिराजची प्रेक्षकांनी खिल्ली उडवली. त्याच्याबद्दल शिवराळ भाषेचा वापर केला.

या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे. मोहम्मद सिराज सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना काही ऑस्ट्रेलियन चाहते त्याला शिवीगाळ करताना व्हिडिओमध्ये दिसतात. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजवर भारताच्या वेगवान गोलंदाजीची भिस्त आहे.

मोहम्मद सिराज बरोबर वॉशिंग्टन सुंदरचीही काही प्रेक्षकांनी खिल्ली उडवली. त्याला त्रास दिला, असे ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्ट्मध्ये म्हटले आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने सामनाधिकाऱ्यांकडे याबद्दल कुठलीही रीतसर तक्रार नोंदवलेली नाही.