पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ऋषभ पंतनं केलेल्या तुफानी खेळीमुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. आजच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेला लायनने माघारी धाडत भारतीय संघाला दबावात टाकलं. मात्र, पाचव्या क्रमांकावर आलेल्या ऋषभ पंतनं सामन्याचं चित्र बदललं आहे. पहिल्या सत्राअखेर ऋषभ पंत ७३ धावांवर खेळत आहे. पंतने ९७ चेंडूचा सामना करताना ८ चौकार आणि तीन षटकार लगावले. अनुभवी चेतेश्वर पुजारानेही आपल्या संयमी फलंदाजीनं ऋषभ पंतला साथ दिली.

पंत-पुजारा जोडीनं पाचव्या गड्यासाठी शतकी भागिदारी केली आहे. पहिल्या सत्रात भारतीय संघानं १०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ऋषभ पंत ७३ तर पुजारा ४१ धावांवर खेळत आहे. भारतीय संघाला विजयासाठी अद्याप २०१ धावा करायच्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाला सामन्यात बाजी मारण्यासाठी सात बळींची गरज आहे.

आणखी वाचा- संकटमोचक पंत; दुखापतीनंतरही कांगारुंची केली धुलाई

ऋषभ पंतनं कसोटी वाचवण्याऐवजी धावा करण्याच्या उद्देशाने खेळ केल्यामुळे सामना रंगतदार अवस्थेत येऊन पोहोचला आहे. दुखापतीमुळे सामन्याबाहेर गेलेला रवींद्र जडेजा, सुमार कामगिरी करणारा हनुमा विहारी इत्यादी बाबी भारताच्या विरोधात असल्याने आता अखेरच्या दोन सत्रात चेतेश्वर पुजारा आणि पंत कशाप्रकारे खेळतात, यावरच या सामन्याचे भवितव्य अवलंबून आहे.

आणखी वाचा- ऑस्ट्रेलिायच्या कर्णधाराला आयसीसीनं ठोठावला दंड

संक्षिप्त धावफलक
* ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ३३८
* भारत (पहिला डाव) : २४४
* ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ८७ षटकांत ६ बाद ३१२ डाव घोषित
* भारत (दुसरा डाव) : ३४ षटकांत ३ बाद २०६