‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीची घोषणा; लवकरच सामन्याचे ठिकाण ठरणार

वर्षांच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणारा भारतीय संघ कांगारूंविरुद्ध गुलाबी चेंडूने प्रकाशझोतातील कसोटीत दोन हात करणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने रविवारी जाहीर केले.

कर्णधार विराट कोहलीने गेल्या महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील कोणत्याही स्टेडियमवर प्रकाशझोतातील कसोटी खेळण्यासाठी सज्ज असल्याचे मत व्यक्त केले होते. त्याला गांगुलीनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

‘‘कोणत्याही स्टेडियममध्ये प्रकाशझोतातील कसोटी सामना खेळण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. यामुळे खेळाडू म्हणून आम्हालाही एक नवा अनुभव मिळतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आम्ही गुलाबी चेंडूने प्रकाशझोतातील कसोटी खेळण्यासाठी उत्सुक आहोत,’’ असे ३१ वर्षीय कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिका विजयानंतर म्हणाला होता.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात भारताने प्रथमच प्रकाशझोतातील कसोटी सामना खेळला. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या त्या सामन्यात भारताने बांगलादेशला सहज धूळ चारली. त्यानंतर भारत प्रथमच प्रकाशझोतातील कसोटी सामना खेळणार आहे. भारतीय संघ ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.

२०१८-१९च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रकाशझोतातील कसोटीचा प्रस्ताव भारताने फेटाळला होता. संघातील खेळाडूंकडे पुरेसा अनुभव नसल्याचे कारण त्यावेळी पुढे करण्यात आले होते. परंतु ऑस्ट्रेलियाच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी भारताला आगामी दौऱ्यात प्रकाशझोतातील कसोटी खेळण्याची विनंती केली. त्याशिवाय ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळानेसुद्धा (सीए) यासंबंधी सातत्याने ‘बीसीसीआय’शी संपर्क सुरू ठेवला. अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून बहुतांशी अ‍ॅडलेड किंवा ब्रिस्बेन येथे हा सामना खेळवला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, गांगुलीने २०२१मध्ये भारत-इंग्लंड यांच्यात रंगणाऱ्या कसोटी मालिकेतसुद्धा एखादी प्रकाशझोतातील लढत खेळवण्याचा विचार मांडला असून लवकरच याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल.

तुम्हाला हे माहीत आहे का?

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सर्वाधिक सात प्रकाशझोतातील कसोटी सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे हे सातही सामने त्यांच्याच मैदानांवर झाले असून त्यांनी अद्याप एकही प्रकाशझोतातील कसोटी गमावलेली नाही.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच मायभूमीत प्रकाशझोतातील कसोटी सामना खेळणार आहे. लवकरच या सामन्याचे ठिकाण ठरवण्यात येईल. त्याचप्रमाणे आगामी प्रत्येक कसोटी मालिकेत किमान एक प्रकाशझोतातील लढत खेळवण्याचा ‘बीसीसीआय’चा विचार आहे.

– सौरव गांगुली, ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष