News Flash

‘चायनामन’ कुलदीप यादवमुळे कांगारुंची दाणादाण

चिनी वंशज असलेला वेस्ट इंडियन गोलंदाज आणि कुलदीपच्या गोलंदाजी शैलीत साम्य

रिस्ट स्पिनर क्रिकेटला वैभवशाली बनवतात. रिस्ट स्पिनरला बघण्याचा रोमांच वेगळाच.

धरमशाला कसोटीत टीम इंडियामध्ये कुलदीप यादवला संधी मिळाली आहे. यादवने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाच्या फलंदाजांची भंबेरी उडवली आहे. कानपूरच्या या २२ वर्षीय गोलंदाजांचे कौतुक होत असून कसोटी खेळणारा तो भारताचा २८८ वा फलंदाज आहे. क्रिकेटमधील देव म्हणजेच सचिन तेंडुलकरनेही ट्विटरवर कुलदीपच्या गोलंदाजीचे भरभरुन कौतुक केले आहे.

दुखापत झाल्याने धरमशालामध्ये सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत विराट कोहलीला माघार घ्यावी लागली. विराटऐवजी मुंबईकर श्रेयस अय्यरला संधी मिळणार अशी चर्चा होती. मात्र श्रेयसऐवजी डावखूरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संघात स्थान मिळाले. कुलदीपला संधी मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण कर्णधाराने दाखवलेला विश्वास कुलदीपने सार्थ ठरवला आणि संघाला वॉर्नर, मॅक्सवेलसारख्या महत्त्वाच्या विकेट मिळवून दिल्या. कुलदीपने कांगारुंच्या तीन महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी पाठवले आहे.

२२ वर्षीय कुलदीप हा मूळचा उत्तरप्रदेशमधील कानपूरचा रहिवासी. अंडर १९ संघाकडून खेळलेला कुलदीप आयपीएलपासून चर्चेत आला होता. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या कुलदीपने नेटमधील सरावादरम्यान मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला त्रिफळाचित करत सर्वांनाच धक्का दिला होता. कुलदीपची चेंडू वळवण्याची शैली बघून तेंडुलकरलाही धक्का बसला होता. कुलदीप यादवने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २२ सामन्यांमध्ये ८१ विकेट घेतल्या आहेत. तर २७ टी ट्वेंटी सामन्यात त्याने ३७ विकेटही घेतल्या आहेत.

कुलदीप यादव या आशिया खंडातील दुसरा चायनामन गोलंदाज ठरला आहे. चायनामन म्हणजे लेफ्ट आर्म स्पिन. यात मनगटाचा वापर केला जातो. सर्वसामान्यपणे डावखुरा गोलंदाज चेंडू टाकतो तो उजव्या फलंदाजाच्या लेग स्टम्पकडून ऑफ स्टम्पकडे वळतो, म्हणजेच लेगस्पिन होतो. पण काही गोलंदाज हा चेंडू उलट दिशेनं म्हणजे गुगलीसारखा वळवण्यात यश मिळवतात. यामुळे फलंदाजाची फसगत होते आणि तो बाद होतो. १९३३ साली एलिस अचाँग नावाच्या चिनी वंशज असलेल्या वेस्ट इंडियन गोलंदाजानं प्रथमच अशा प्रकारचा चेंडू टाकल्यामुळे त्याला ‘चायनामन’ म्हटलं गेलं असे उल्लेख सापडतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर चायनामन गोलंदाजांची संख्या कमी आहे. ऑस्ट्रेलियाचा ब्रॅड हॉग, आफ्रिकेचा पॉल एडम्‍स यांच्यासारख्या गोलंदाजांना चायनामन म्हणून ओळखले जायचे. विशेष म्हणजे आपण टाकत असलेल्या बॉलला चायनामन म्हटले जाते याची माहितीही कुलदीपला नव्हती.

आशिया खंडातून श्रीलंकेचा लक्षण रंगिका हा पहिला चायनामन गोलंदाज होता. जुलै २०१६ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते. आता कुलदीपनेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच पदार्पण केले हेदेखील विशेषच म्हणावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 2:31 pm

Web Title: india vs australia dharamsala 4th test kuldeep yadav india first chinaman bowler rare left arm spinner
Next Stories
1 विराट कोहली बनला १२ वा खेळाडू, संघसहकाऱ्यांना पाजलं पाणी
2 कोहलीच्या अनुपस्थितीत मुंबईकर अजिंक्य रहाणे कर्णधार
3 india vs australia test: ऑस्ट्रेलियाचा डाव ३०० धावांवर आटोपला
Just Now!
X