News Flash

विराट कोहली बनला १२ वा खेळाडू, संघसहकाऱ्यांना पाजलं पाणी

मैदानाची ओढ दुखापतग्रस्त कोहलीला स्वस्थ बसू देईना

कोहली चक्क १२ वा खेळाडू म्हणून मैदानात पाणी घेऊन आला होता. (सौजन्य - बीसीसीआय)

दुखापतीमुळे विराट कोहली चौथ्या कसोटीला मुकला असला तरी मैदानाची ओढ दुखापतग्रस्त कोहलीला स्वस्थ बसू देत नसल्याचे शनिवारी दिसून आले. कोहली संघ सहकाऱ्यांसाठी चक्क पाणी घेऊन मैदानात आला होता. कोहलीच्या या खेळाडूवृत्तीचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.

धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरु आहे. दुखापतीमुळे विराट कोहलीला सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. कोहलीला मैदानात बघता येणार नाही अशी खंत उपस्थित क्रीडाप्रेमींना वाटत होती. पण काही वेळेपुरता मैदानात येऊन कोहलीला चाहत्यांना दिलासा दिला. कोहली चक्क १२ वा खेळाडू म्हणून मैदानात पाणी घेऊन आला होता.

सामना सुरु झाल्याच्या तासाभरानंतर ड्रिंक ब्रेकदरम्यान कोहली पाणी घेऊन मैदानात आला होता. मैदानात आल्यावर त्याने टीममधील सहकाऱ्यांशी संवादही साधला. १२ वा खेळाडू म्हणून पाणी आणण्याच्या कामाचाही कोहली आनंद घेताना दिसत होता. खेळाडूंसोबत तो थट्टामस्करी करतानाही दिसत होता.

कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आली आहे.रहाणेच्या  नेतृत्वाची झलक फलंदाजीतसुद्धा दिसू शकेल. कोहलीची आक्रमकता जरी त्याच्यात नसली तरी महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा पुरेसा अनुभव असलेला रहाणे स्वत:च्या नेतृत्वाची एक उत्तम रणनीती जपणारा आहे. कोहलीच्या जागी कुलदीप यादव या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाला संघात स्थान मिळाले आहे. रांचीत झालेल्या तिसऱ्या कसोटीत कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 1:27 pm

Web Title: india vs australia dharamsala test video virat kohli carries drinks for team india
Next Stories
1 कोहलीच्या अनुपस्थितीत मुंबईकर अजिंक्य रहाणे कर्णधार
2 india vs australia test: ऑस्ट्रेलियाचा डाव ३०० धावांवर आटोपला
3 भारताचे ‘ट्रम्प’ कार्ड चालणार का?
Just Now!
X