बेभरवशाचा खेळाडू असा ठपका असलेल्या ऋषभ पंतवर सध्या चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतोय. ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचविनिंग खेळीनंतर त्याची क्रिकेटमधल्या दिग्ग्जांबरोबरही तुलना सुरु झाली आहे. शुबमन गिलची (९१) धावांची खेळी आणि पंतच्या नाबाद (८९) धावा यामुळे ब्रिस्बेन कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारताला ३२८ धावांचे कठिण लक्ष्य पार करता आले. १९८८ नंतर प्रथमच गाबाच्या या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला.

ऑस्ट्रेलियातील या कामगिरीबद्दल स्पोटर्स टुडेवर बोरीया मुजुमदार यांच्याशी बोलताना पंत म्हणाला की, “धावांचा पाठलाग करण्याला माझी पसंती असते. सामना ड्रॉ करण्याला कधीही माझे प्राधान्य नसते.” “सामना जिंकण्याचा प्रयत्न करा, हीच संघ व्यवस्थापनाची सुरुवातीपासूनची योजना होती. मी देखील सामना जिंकायचाच विचार करतो. मला प्रत्येक सामन्यात जिंकायचा असतो. त्या दृष्टीनेच मी खेळ खेळतो, सामना ड्रॉ करणं हा दुसरा पर्याय असतो” असे पंत म्हणाला.

आणखी वाचा- भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय द्रविडला दिलं जात असतानाच, द्रविड म्हणतो…

नॅथन लायनच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियन यष्टीरक्ष टीम पेनने पंतला यष्टीचीत करण्याची संधी दवडली. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर ऋषभने क्रीझ बाहेर येऊन चेंडूला स्टेडियमच्या स्टँडमध्ये पाठवले. “खेळपट्टीवर चेंडू वळत असताना तुम्ही तो सोडत असाल, तर धोका नाही. पण तुम्ही असे चेंडू खेळण्याचे प्रयत्न केले, तर फटका चुकण्याची शक्यता असते” असे ऋषभने सांगितले.