ऑस्ट्रेलियाकडून ४-३ ने पराभूत

भुवनेश्वर : ‘एफआयएच’ प्रो हॉकी लीगमध्ये नेदरलँड्स आणि बेल्जियम या बलाढय़ संघांविरुद्ध वर्चस्व गाजवल्यानंतर भारताला शुक्रवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अखेपर्यंत झुंजवले. तीन गोलच्या पिछाडीनंतर जोमाने पुनरागमन करणाऱ्या भारताला ऑस्ट्रेलियाकडून ३-४ असा पराभव सहन करावा लागला.

कलिंगा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच भारतावर वर्चस्व गाजवले होते. या मैदानावर नेहमीच चांगली कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने डायलन वूथरस्पून (सहाव्या मिनिटाला), टॉम विकहॅम (१८व्या मिनिटाला), लचन शार्प (४१व्या मिनिटाला) आणि जेकब अँडरसन (४२व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे विजय मिळवला. भारताकडून राजकुमार पाल याने (३६व्या आणि ४७व्या मिनिटाला) दोन गोल झळकावले तर रुपिंदरपाल सिंगने ५२व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला.

सहाव्या मिनिटाला डायलनने पाहुण्यांचे खाते खोलल्यानंतर दुसऱ्या सत्रात टॉमच्या गोलमुळे ऑस्ट्रेलियाने २-० अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर मात्र भारतीय संघाने जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन केले. तिसऱ्या सत्रात अधिक आक्रमक खेळ करत भारताने ३६व्या मिनिटाला पहिला गोल केला. पेनल्टी कॉर्नरवर रुपिंदरपालने मारलेला फटका ऑस्ट्रेलियाच्या गोलरक्षकाने अडवल्यावर राजकुमारने चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली.

चौथ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने दोन मिनिटांत दोन गोल करत ४-१ अशी भक्कम आघाडी घेतली. पण राजकुमार आणि रुपिंदरपाल यांनी गोल करत भारताच्या बरोबरीच्या आशा कायम ठेवल्या. सामना संपायला ३५ सेकंदाचा अवधी शिल्लक असताना पेनल्टी कॉर्नरवर रुपिंदरपालने मारलेला फटका गोलजाळ्याच्या बाजुने गेला आणि भारताची बरोबरीची संधी हुकली. आता शनिवारी होणाऱ्या परतीच्या सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने असतील.

’  सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वा.

’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १