युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघानं पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्राअखेर एक गड्याच्या मोबदल्यात ८३ धावा केल्या आहे. अखेरच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर अनुभवी रोहित शर्माला कमिन्सनं टिम पेनकरवी झेलबाद केलं. रोहित शर्मा सात धावांवर बाद झाला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सामन्याची सुत्रं शुबमन गिलनं आपल्या हाती घेतली. अनुभवी चेतेश्वर पुजारानं संयमी फलंदाजी करत शुबमन गिलला चांगली साथ दिली आहे.

पुजारा आणि गिल या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागिदारी करत संघाचा डाव सावरला आहे. शुबमन गिलनं कारकिर्दीतील आपलं दुसरं आर्धशतक झळकावलं. पुजारानं ८९ चेंडूचा सामना करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलंच दमवलं आहे. युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलनं ११७ चेंडूचा सामना करताना ६४ धावा केल्या. गिलनं आपल्या अर्धशतकी खेळीमध्ये एक खणखणीत षटकार आणि पाच चौकार लगावलेत. पहिल्या सत्रात भारतीय संघानं रोहित शर्माची विकेट गमावली. गिलचं आक्रमक अर्धशतक आणि पुजाराच्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारतीय संघानं पहिल्या सत्रात ३६ षटकांत एका गड्यांच्या मोबदल्यात ७९ धावा केल्या आहेत. भारतीय संघाला विजयासाठी अद्याप २४५ धावांनी गरज आहे. तर ऑस्ट्रेलियाला ९ विकेटची गरज आहे.

आणखी वाचा- … तर पराभवापेक्षाही ऑस्ट्रेलियावर मोठी नामुष्की ओढवेल – पाँटिग

बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियानं तर दुसऱ्या सामन्यात भारतानं विजय मिळवला होता. तिसरा कसोटी सामना भारतीय संघान अनिर्णित राखला होता. त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून चषकावर नाव कोरण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल. गाबाच्या मैदानावर आतापर्यंत चौथ्या डावात २५० पेक्षा जास्त धावांचं आव्हान एकदाही कोणत्याही संघाला पार करता आलं नाही. शिवाय, मागील १०० वर्षात या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत एकदाही पराभव झाला नाही. त्यामुळे ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावरील हा रेकॉर्ड भारतीय संघ मोडणार का? याकडे क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलं आहे.