सिडनी येथे झालेला तिसऱ्या कसोटी सामना अनिर्णीत राखत भारतीय संघानं बॉर्डर-गावसकर मालिका १-१ बरोबरीत राखली आहे. तिसरा कसोटी सामना भारतीय फलंदाजाला झालेल्या दुखापतीमुळे चर्चेत राहिला. रविंद्र जाडेजा, ऋषभ पंत, अश्विन आणि हनुमा विहारी यांना तिसऱ्या कसोटी सामन्यात दुखपत झाली होती. मात्र, दुखापतीनंतरही त्यांनी हार न मानता भरताचा पराभव टाळला. मात्र, चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात मोलाची भूमिका बजावणारा हनुमा विहारी मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाही.

आणखी वाचा- मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला चौथ्या कसोटीत संधी मिळण्याचे संकेत

सिडनी कसोटीदरम्यान फलंदाजी करताना हनुमा विहारीच्या मांडीचे स्नायू दुखावले होते. त्याला फलंदाजीदरम्यान, प्रचंड त्रास होत होता. मात्र तरीही त्यानं जिद्द न सोडता एक बाजू लावून धरत ऑस्ट्रेलियाचे वेगवान आक्रमण थोपवून धरलं. दुखापत झाली असतानाही हनुमा विहारीनं १६१ चेंडूंचा सामना करत सामना वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली. सामना संपल्यानंतर हनुमाचे स्कॅन करण्यात आले, मंगळवारी अहवाल येणे अपेक्षित आहे. दुखापतीनंतर चौथ्या कसोटीत तो खेळू शकणार नाही हे तपासणीनंतर फिजिओने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. विहारीची दुखापत किती गंभीर आहे, हे स्कॅनच्या रिपोर्टनंतर कळेल असे बीसीसीआयच्या एका सूत्रांनी पीटीआयला सांगितले. जर त्याला ग्रेड 1 ची दुखापत झाली असेल तर तो कमीतकमी ४ आठवड्यांसाठी बाहेर बसेल. अशा परिस्थितीत केवळ ब्रिस्बेनच नव्हे तर तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतूनही बाहेर पडेल.

आणखी वाचा- भारतीय संघाला आणखी एक धक्का, जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त

हनुमा विहारीच्या जागी कोणाला मिळणार संधी –
हनुमा विहारीच्या जागी कोणाला संधी मिळणार, याची सध्या क्रीडा प्रेमींमध्ये चर्चा सुरु आहे. हनुमा विहारीच्या जागी सध्या दोन फलंदाज दावेदार आहेत. मयांक अगरवाल आणि वृद्धीमान साहा हे दोन पर्याय अजिंक्य रहाणेकडे आहेत. वृद्धीमान साहाला संधी दिल्यास ऋषभ पंतला फक्त एक स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून मैदानावर उतरवलं जाऊ शकतं. अन्यथा मयांक अगरवलाल याला मधल्या फळीत पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते. दुसरा नवीन चेंडू आल्यानंतर मयांकची खेळी निर्णायक ठरु शकते.