बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतासमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी ४०७ धावांचं आव्हान दिलं आहे. या डोंगराएवढ्या आव्हानाचा भारतीय संघ पाठलाग करणार का? असा प्रश्न सर्वच क्रीडाप्रेमींना सतावत आहे. तुमच्याही मनात तसा प्रश्न भेडसावत असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो की याआधी भारतीय संघानं ४०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करुन सामना जिंकला आहे. तीच कामगिरी भारतीय संघ पुन्हा करणार का? पाहूयात तेव्हा नेमकं काय झालं होतं…
वेस्ट इंडिजविरोधात रचला इतिहास –
१९७७ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर ७ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान रंगलेल्या सामन्यात भारतीय संघानं ४०३ धावांचं आव्हान लिलया पेललं होतं. वेस्ट इंडिजनं पहिल्या डावात ३५९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ २२८ धावांवर गारद झाला होता. पहिल्या डावातील आघाडीत वेस्ट इंडिजनं दुसऱ्या डावात २७१ धावांची भर घातली. वेस्ट इंडिज संघानं भारताला विजयासाठी ४०3 धावांचं आव्हान दिलं होतं. सुनील गावसकर (१०२) आणि गुंडप्पा विश्वनाथ (११२) यांची शतकी खेळी आणि मोहिंदर अमरनाथ यांनी केलेल्या ८५ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं ४ गड्यांच्या मोबदल्यात ४०६ धावा चोपल्या होत्या.
इंग्लंडलाही लोळवलं-
२००८ च्या दौऱ्यावर इंग्लंडचा संघ भारतात आला होता. त्यावेळी चेन्नई येथे रंगलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं पहिल्या डावात ३१६ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर भारताचा डाव २४१ धावांत गुंडाळला होता. दुसऱ्या डावात इंग्लंडनं ३११ धावांवर डाव घोषित करत भारताला ३८७ धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. दुसऱ्या डावात दबावाद फलंदाजी करताना विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी भारताला तुफानी सुरुवात करुन दिली होती. त्यानंतर सचिन तेंडुलकरनं नाबाद शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. ३८७ धावांचा पाठलाग करताना गौतम गंभीर (६६), विरेंद्र सेहवाग (८३) आणि युवराज सिंग (८५*) यांची अर्धशतकी खेळी आणि सचिन तेंडुकरची (१०३*) शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं हा सामना सहा विकेटनं जिंकला होता.
ऑस्ट्रेलियात भारतीय संघ इतिहास घडवणार का?
ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाला विजयासाठी ४०७ धावांचं आव्हान दिलं आहे. रोहित शर्मा-शुबमन गिल यांनी भारतीय संघाला चांगली सलामी दिली आहे. दुखापतीचं ग्रहण लागलेला भारतीय संघ हे डोंगराएवढं आव्हान पार करणार का? हा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या अनुभवी खेळाडूंवर प्रामुख्यानं मदार असणार आहे. यांच्याजोडीला शुबमन गिल, हनुमा विहारी आणि ऋषभ पंत या युवा खेळाडूंचा भरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2021 11:19 am