महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बुधवारी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने भारतावर ८ गडी राखून आरामात विजय मिळवला. पुनम राऊतच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर २२७ धावांचे आव्हान उभे केले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाची कर्णधार लॅनिंग हिने नाबाद ७६ धावांची खेळी करत संघाला सहजपणे विजय मिळवून दिला. विश्वचषक स्पर्धेतील हा ऑस्ट्रेलियाचा सलग पाचवा विजय आहे. तर आजच्या पराभवामुळे भारतीय संघाच्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

भारताच्या २२७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवातच दमदार झाली. बोल्टन आणि मुनी यांनी पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. पुनम यादवने बोल्टनला ३६ धावांवर बाद करत भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर लगेचच मुनी हीदेखील ४५ धावांवर धावचीत झाली. मात्र, त्यानंतर एलिस पेरी आणि कर्णधार लॅनिंग यांनी १२४ धावांची अभेद्य भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या सामन्यात फिरकी गोलंदाजांचे अपयश आणि गचाळ क्षेत्ररक्षण ही भारतीय संघाच्या पराभवाची मुख्य कारणे ठरली.

महिला क्रिकेट विश्वात भारताच्या मितालीचं ‘राज’

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २२६ धावा केल्या. स्मृती मंधाना अवघ्या ३ धावा करूनच तंबूत परतल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला. मात्र, त्यानंतर भारताची कर्णधार मिताली राज आणि पुनम राऊत यांनी दुसऱ्या विकेटसाठी १५७ धावांची शानदार भागीदारी रचली. या सामन्यात मिताली राजने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातली. मिताली महिला क्रिकेटविश्वात सर्वात जास्त धावा करणारी महिला क्रिकेटपटू बनली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना सुरु होण्याआधी मिताली या विक्रमापासून ३३ धावा दूर होती. मितालीने या सामन्यात ६९ धावा केल्या. तर दुसरीकडे पुनम राऊत हिने शानदार १०६ धावा फटकावल्या. मात्र, या दोघीही बाद झाल्यानंतर इतर भारतीय फलंदाज मैदानावर टिकाव धरू शकले नाहीत. भारताने अवघ्या ५ धावांमध्ये ३ विकेट गमावल्या. त्यामुळे भारतीय संघाला २२६ धावांवर समाधान मानावे लागले.