दुसऱ्या टी-२० सामन्यात हार्दिक पांड्याच्या नाबाद ४२ धावांच्या बळावर भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा ६ गड्यांनी पराभव केला. हार्दिक पांड्यानं तुफानी फलंदाजी करत सामना खेचून आणला. हार्दिक पांड्याची फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टिन लँगर यांना धोनीची आठवण झाली आहे. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना लँगर यांनी पांड्याच्या खेळीला अविश्वसनीय म्हणत त्याची तुलना धोनीशी केली आहे… ऑस्ट्रेलियाचे मुख्य कोच जस्टिन लँगर सामन्यानंतर म्हणाले की, ‘हार्दिक पांड्याची खेळी अविश्वसनीय आणि तुफानी होती. आपल्याला माहित आहे की पांड्या किती विस्फोटक फलंदाज आहे. याआधी धोनीला अशी फलंदाजी करताना पाहिलं आहे. पांड्यानं आजच्या सामन्यात धोनीसारखीच फलंदाजी केली.’

पांड्यानं आतापर्यंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली फलंदाजी केली आहे. दुसऱ्या सामन्यातील हार्दिक पांड्याची ४२ धावांची खेळी सामना फिरवणारी होती. अनुभवी खेळाडूंमुळेच टी-२० मालिका जिंकण्यास भारतीय संघाला फायदा झाला आहे. दुसरा सामना रोमांचक झाला. दोन्ही संघाला जिंकण्याची संधी होती. पण भारतीय संघातील अनुभव आमच्यावर वरचढ ठरला, असे ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टिन लँगर म्हणाले.

(आणखी वाचा : भारताच्या विजयावर रोहितची प्रतिक्रिया, म्हणाला… )

ऑस्ट्रेलिया संघात अनेक अनुभवी खेळाडू नव्हते. त्यामुळे नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली होती. फिंच, वॉर्नर, स्टार्क आणि हेजलवूडसारखे दिग्गज खेळाडू ऑस्ट्रेलिया संघात नव्हते. या संधीचा फायदा घेत भारतीय संघानं ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात हार्दिक पांड्यानं फक्त २२ चेंडूत विजयी ४४ धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याच्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर अखेरच्या पाच षटकांत भारतीय संघात ५४ धावा वसूल केल्या आहेत. धोनीच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्यानं फिनिशरची भूमिका निभावली आहे. अखेरच्या षटकांत भारतीय संघाला विजयासाठी १४ धावांची गरज होती पांड्यानं फक्त चार चेंडूमध्ये १४ धावा चोपल्या. त्यामुळे हार्दिकच्या तुफानी खेळीच्या बळावर भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

रोहित-बुमराहशिवाय भारतानं टी-२० मालिका जिंकली, पाहा विराट कोहली काय म्हणाला…

दुसऱ्या सामन्यात भारताचा विजय –

ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांच्यात मैदानात मात देत भारताने दुसरा टी२० सामना जिंकला आणि मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. कर्णधार मॅथ्यू वेडच्या तुफानी ५८ धावा आणि त्याला स्टीव्ह स्मिथने (४६) दिलेली साथ यांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने १९४ धावांची धावसंख्या उभारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवनचं अर्धशतक (५२) आणि हार्दिक पांड्याच्या धडाकेबाज नाबाद ४२ धावांच्या जोरावर भारतीय संघाने सामना ६ गडी राखून जिंकला.