टी-२० मालिकेत पिछाडीवर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत वाढ झाली आहे. दुखापतीमुळे याआधी काही खेळाडू टी-२० मालिकेबाहेर असताना ऑस्ट्रेलियासाठी आणखी एक चिंता वाढवाणारी बातमी आली आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं उर्वरित टी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. आयसीसीनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आज, होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला स्टार्कशिवाय मैदानात उतरावं लागणार आहे.

कुटुंबातील व्यक्ती आजारी असल्यामुळे स्टार्कनं उर्वरित टी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. कॅनबेरा येथून सिडनीला पोहचल्यानंतर मिचेल स्टार्क बायोबबलमधून बाहेर निघाला. यावेळी मिचेल स्टार्कनं क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि मुख्य कोच यांना याची कल्पना दिली. ‘ या जगात कुटुंबाशिवाय काहीच महत्वाचं नाही, याप्रकरणातही मिचेल स्टार्क अपवाद राहिला नाही, अशी प्रतिक्रिया मुख्य कोच जस्टिन लँगर यांनी दिली. ‘

(आणखी वाचा : ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का )

मिचेल स्टार केव्हा संघात पुनरागमन करणार याबाबत लँगर यांनी बोलणं टाळलं. ते म्हणाले की, ‘आम्ही मिचेलला हवा तेवढा वेळ दिला आहे. त्याला जेव्हा योग्य वेळ वाटेल तेव्हा तो संघात परत येऊ शकतो. आम्ही त्याचं स्वागत करण्यास तयार आहोत.’ जस्टिन लँगरच्या या प्रतिक्रियेमुळे आगामी कसोटी मालिकेत स्टार्क खेळणार का? यावर प्रश्नचिन्ह आहे. मिचे स्टार्कनं टी-२० मालिकेतून माघार घेतल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्याचा बदली खेळाडू घेतलेला नाही. त्यामुळे स्टार्कच्या अनुपस्थितीत अँड्रू टाय किंवा डॅनिअल सॅम्स आज खेळताना दिसू शकतो.

ऑस्ट्रेलियाला दुखापतीची चिंता

दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नरने ट्वेन्टी-२० मालिकेतून माघार घेतली असून त्यात आता कर्णधार आरोन फिंचच्या दुखापतीची भर पडली आहे. मांडीचे स्नायू ताणले गेल्याने फिंचच्या समावेशाविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यातच भारत ‘अ ’आणि ऑस्ट्रेलिया ‘अ ’ यांच्यात होणाऱ्या सराव सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ व्यवस्थापनाने अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनला मुक्त केले असून त्याच्या जागी अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनचा समावेश केला आहे. त्यामुळे मिचेल स्वीपसनच्या जागी त्याला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.