२७ नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू कसून सराव करत आहेत. सरावावेळीही भारतीय खेळाडू मजाही करत असल्याचं आपण अनेक व्हिडीओमध्ये पाहिलं आहे. सराव सत्रांमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेला कारनामा नेटिझन्स खूश झाले आहेत. बीसीसीआयनं याचा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे.

या व्हिडीओमध्ये जाडेजा आणि बुमराह यांनी एकमेंकाच्या गोलंदाजीची नकल केल्याचं पहायला मिळालं आहे. यामध्ये युवा फलंदाज पृथ्वी शॉही मागे राहिला नाही. जाडेजाने आधी बुमराहच्या गोलंदाजी शैलीची नकल केली. जाडेजानं बुमराहसारखं डाव्या हातात चेंडू घेऊन वेगवान गोलंदाजी केली. त्यानंतर बुमराहनं जाडेजाच्या फिरकी गोलंदाजीची हुबेहूब नकल केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायलं मिळत आहे. बुमराहचे हे कौशल्य पाहून चाहते देखील हैराण राहिले. यानंतर पृथ्वी शॉ यानं दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे आणि मुथय्या मुरलीधरन यांच्या शैलीत गोलंदाजी केली.

उद्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर तीन टी-२० सामने आणि चार कसोटी सामन्याची मालिका भारत खेळणार आहे.