यजमान ऑस्ट्रेलियानं गाबा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी भेक मारा करत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. १७ धावांवरच भारतीय गोलंदाजांनी धोकादायक वॉर्नर आणि हॅरीसला तंबूत धाडलं होतं. मात्र, त्यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. लाबुशेन यानं तर सुरुवातीला संयमी फलंदाजी करत भारतीय गोलंदाचा चांगलाच समाचार घेतला.

लाबुशेनच्या शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियानं सन्माजनक धावसंख्याकडे आगेकूच केली आहे. लाबुशेन यांनं २०४ चेंडूचा सामना करत १०८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान लाबुशेन यानं ८ खणखणीत चौकारही लगावले. यष्टीरक्षक पंतकरवी झेलबाद करत नटराजन यानं लाबुशेनची खेळी संपुष्टात आणली. पण कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा या दोघांनी लाबुशेनचे सोपे झेल सोडले. याचा फटका भारतीय संघाला बसला आहे. लाबुशेन ३७ धावांवर खेळत असताना नवदीप सैनीच्या चेंडूवर अजिंक्य रहाणेकडून सोपा झेल सुटला. आपल्याकडून झेल सुटल्याचं अंजिक्यलाही विश्वास बसला नाही. त्यानंतर ४८ धावांवर खेळत असताना चेतेश्वर पुजाराकडूनही लाबुशेनचा झेल सुटला. त्यानंतर लाबुशेन यांनं याचा फायदा घेत शतकी खेली केली.

लाबुशेन यानं तिसऱ्या गड्यासाठी स्मिथसोबत ७० धावांची भागिदारी केली. स्मिथ बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेडसोबत चौथ्या गड्यासाठी ११३ धावांची निर्णायक भागिदारी रचत संघाची धावसंख्या वाढवली.

भारतीय संघानं संपूर्ण दौऱ्यात गचाळ क्षेत्ररक्षण केलं आहे. मार्नस लाबुशेन यांचे जवळपास सहा ते सात झेल भारतीय खेळाडूंनी सोडले आहेत. लाबुशेन यांनं याचा फायदा घेत धावांचा पाऊस पाडला आहे. बॉर्डर-गावसकर मालिकेत सर्वाधिक धावा मार्नल लाबुशेनच्या नावावर आहेत. लाबुशेन यानं सात डावांत फलंदाजी करताना दोन अर्धशतकं आणि एका शतकाच्या मदतीनं ४०१ धावा चोपल्या आहेत.