भारतीय संघाने बॉर्डर-गावस्कर चषक जिंकत इतिहासात आपली नोंद केली आहे. गाबाच्या मैदानावर चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. ऑस्ट्रेलियाच्या अनेक दिग्गजांनी विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ अडचणीत असून मोठ्या पराभवाचा सामना करावा लागेल असं भाकीत वर्तवलं होतं. पण भारतीय संघाने त्या सर्वांचं तोंड बंद केलं आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कचाही समावेश होता. ऑस्ट्रेलियाचा ३२ वर्षांचा अबाधित रेकॉर्ड तुटल्याने मायकल क्लार्क संतापला असून चांगलंच सुनावलं आहे.

मायकल क्लार्कने ऑस्ट्रेलिया संघाच्या नकारात्मक दृष्टीकोनावरुन नाराजी व्यक्त केली आहे. विजयासाठी आक्रमकतेने खेळण्याऐवजी ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाची भीती वाटत होती असं मायकल क्लार्कने म्हटलं आहे. क्लार्कने यावेळी ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टिम पेनला यासाठी जबाबदार धरण्यास नकार दिला.

ऑस्ट्रेलियन जर्सीत ‘भारत माता की जय’ची घोषणा; हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल

ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटी सामन्यात मंगळवारी भारताने ऑस्ट्रेलियाच्या ३२८ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करीत तीन गडी राखून झुंजार विजय मिळवला आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेवर २-१ असा कब्जा केला. “मला वाटतं काही ठिकाणी आम्ही अत्यंत नकारात्मक दृष्टीकोन ठेवला होता. आक्रमकपणे आणि जिंकण्यासाठी खेळण्याऐवजी आम्हाला पराभवाची भीती वाटत होती.” असं मायकल क्लार्कने बिग स्पोर्ट्स ब्रेकफास्टमध्ये बोलताना म्हटलं.

पेनच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने २३ कसोटी सामने खेळले असून यामधील फक्त ११ सामने जिंकले आहेत. घरच्या मैदानावर भारताविरोधातील दोन कसोटी मालिकांमधील पराभव असा नकोसा रेकॉर्डही त्याच्या नावावर झाला आहे. क्लार्कने भारताविरोधातील पराभवाला संपूर्णपणे नकारात्मक दृष्टीकोन कारणीभूत ठरल्याचं म्हटलं आहे.

“दिवसाच्या शेवटी आपण २० ओव्हर्स ठेवून पराभूत झालो की शेवटच्या चेंडूवर यामुळे फरक पडत नाही. आपल्याला तो खेळ आणि ट्रॉफी दोन्ही जिंकायचं होतं. सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत आपण त्याच दृष्टीकोनातून खेळायला हवं होतं,” असं मत क्लार्कने व्यक्त केलं आहे.

क्लार्कने काय भाकीत वर्तवलं होतं –
विराट कोहली भारतात परतल्यानंतर क्लार्कने संघ अडचणीत असल्याचं म्हटलं होतं. “विराट कोहलीशिवाय पुढील कसोटी सामन्यांत तुम्ही भारतीय बॅटींग लाईनअपचा विचारही करु शकत नाही. टीम इंडिया आता मोठ्या संकटात आहे,” असं क्लार्कचं म्हणणं होतं.