तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे औपचारिक तक्रार नोंदवली आहे. सिडनीच्या मैदानावर मद्याच्या अमलाखाली असलेल्या काही समर्थकांनी मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी शेरेबाजी केली.

त्यांची वक्तव्ये खूपच अपमानास्पद होती. हा प्रकार कर्णधार अजिंक्य रहाणेच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने या बाबत मैदानावरील पंचांकडे धाव घेतली. तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात हा प्रकार घडला. जेव्हा सिराज सीमा रेषेवर फाइन लेगला क्षेत्ररक्षण करत होता. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

बरोबर १३ वर्षांपूर्वी याच सिडनीमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत वर्णद्वेषी शेरेबाजीवरुन एक मोठा वाद झाला होता. अँड्रयू सायमंडसने हरभजन सिंगवर वर्णद्वेषी शेरेबाजीचा आरोप केला होता. हरभजनने वर्णद्वेषी शेरेबाजी करताना मला माकड म्हटले असा आरोप सायमंडसने केला होता. या आरोपाचे मैदानावर आणि मैदानाबाहेरही पडसाद उमटले. दोन्ही संघांमधील मैत्रीपूर्ण वातावरण बिघडले होते. दोन्ही देशाची क्रिकेट मंडळ, खेळाडू, माजी खेळाडू, मीडिया आणि दोन्ही देशाची सरकारं या वादामध्ये सहभागी झाली होती.