विलगीकरणाच्या कडक धोरणामुळे भारतीय संघाने ब्रिस्बेन येथे चौथी कसोटी खेळण्यास विरोध दर्शवलेला नाही, असे स्पष्टीकरण ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ मंडळाचे मुख्य कार्यकारी निक हॉकले यांनी दिले आहे.

‘‘क्वीन्सलँडमधील विलगीकरणाबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) संपूर्ण माहिती आहे. ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांशी आमची दैनंदिन चर्चा होत असते. दोन्ही संघ नियोजित कार्यक्रमपत्रिकेनुसार मालिका खेळतील,’’ असे हॉकले म्हणाले.

विलगीकरणाच्या कडक नियमांमुळे भारतीय क्रिकेट संघाने ब्रिस्बेनला जाण्यास अनुत्सुकता दर्शवल्यामुळे चौथ्या कसोटीपुढे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. त्यामुळे चौथी कसोटी सिडनीतच होण्याची शक्यता आहे, असा दावा ऑस्ट्रेलियामधील प्रसारमाध्यमांनी केला होता.

करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढल्यामुळे न्यू साऊथ वेल्समधील नागरिकांना क्विन्सलँडमध्ये प्रवासास मज्जाव करण्यात आला आहे. परंतु भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ जैव-सुरक्षित वातावरणात असल्याने त्यांना प्रवासास मुभा देण्यात आली आहे.

चौथी कसोटी १०० टक्के ब्रिस्बेनलाच खेळू -लायन

भारताविरुद्धचा चौथा कसोटी सामना आम्ही १०० टक्के ब्रिस्बेनलाच खेळणार आहेत, अशी ग्वाही ऑस्ट्रेलियाचा ऑफ-स्पिनर नॅथन लायनने दिली आहे. ‘‘खेळाडू म्हणून आम्हाला तिसरी कसोटी सिडनीत आणि चौथी कसोटी ब्रिस्बेनला एवढेच माहीत आहे. कार्यक्रमपत्रिका अशीच राहील,’’ असे लायनने सांगितले.

सिडनीत प्रेक्षकमर्यादा २५ टक्क्यांवर!

सिडनीत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी स्टेडियममधील प्रेक्षकमर्यादा घटवून २५ टक्क्यांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्यामुळे न्यू साऊथ वेल्स राज्य सरकारने ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ मंडळाला हे निर्देश दिले आहेत. सिडनी क्रिकेट मैदानाची प्रेक्षक क्षमता ३८ हजार असून, आता जवळपास ९,५०० प्रेक्षकांना हजेरी लावता येणार आहे. ‘‘सुरक्षित अंतर राखण्याच्या हेतूने प्रेक्षकमर्यादा घटवण्यात आली आहे. तिकीटधारकांनी नव्या धोरणाचा योग्य आदर राखल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. तिकिटे रद्द झालेल्या प्रेक्षकांना पैसे परत देण्यात येतील,’’ असे हॉकले यांनी सांगितले. या मैदानावर भारतीय संघ दोन एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामने खेळला आहे.

पॅटिन्सनची माघार

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनने बरगडय़ांना झालेल्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. त्याच्याजागी बदली खेळाडू जाहीर केला जाणार नाही. ब्रिस्बेन कसोटीआधी पॅटिन्सनच्या दुखापतीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ मंडळाने दिली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या अंतिम संघात मायकल नेसा किंवा सीन अ‍ॅबॉट यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकेल.

भारतीय पथकातील सर्वाच्या करोना चाचण्यांचे अहवाल नकारात्मक

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि मार्गदर्शकांच्या झालेल्या ताज्या करोना चाचण्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत, अशी माहिती ‘बीसीसीआय’कडून देण्यात आली आहे. ७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाश्र्वभूमीवर भारतीय पथक सिडनीत दाखल झाले. या पाश्र्वभूमीवर ३ जानेवारीला सर्वाच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या.