16 October 2019

News Flash

कसोटी यशानंतर आता विश्वचषकाची रंगीत तालीम

आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात पंडय़ाच्या जागी जडेजाला संधी

आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात पंडय़ाच्या जागी जडेजाला संधी

कसोटी क्रिकेटमधील अपेक्षा उंचावणाऱ्या यशानंतर भारतीय क्रिकेटला एका अनपेक्षित वादाने हादरवले आहे. आता विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या तयारीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शनिवारपासून सुरू होणारी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका म्हणजे संघबांधणीसाठी रंगीत तालीम ठरणार आहे.

हार्दिक पंडय़ा आणि लोकेश राहुल यांनी एका टीव्ही कार्यक्रमात महिलांसदर्भात व्यक्त केलेल्या मतांमुळे एकदिवसीय मालिकेआधी वाद निर्माण झाला आहे. प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडल्जी यांनी या दोघांना चौकशी चालू असेपर्यंत निलंबित करण्याच्या सूचना दिल्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्याला त्यांना मुकावे लागणार आहे.

पंडय़ा या सामन्यात खेळण्याची शक्यता होती. कारण १० षटके गोलंदाजी आणि मधल्या फळीत धुवाँदार फलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी जसप्रीत बुमराला विश्रांती दिल्यामुळे अखेरच्या षटकांमध्ये पंडय़ा उपयुक्त ठरला असता. मात्र आता भुवनेश्वर कुमारसह वेगवान माऱ्याचे त्रिकूट खेळवावे लागणार आहे. या परिस्थितीत मोहम्मद शमी आणि खलील अहमद यांना संघात स्थान मिळू शकेल. सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर हलकेसे गवत असल्यामुळे दोन फिरकी गोलंदाजीचे पर्यायसुद्धा संघात असणे आवश्यक आहे.

पंडय़ाच्या अनुपस्थितीत रवींद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडू संघात असेल. पाच गोलंदाजांच्या माऱ्यात डावखुरा मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवसुद्धा संघात असेल. याशिवाय केदार जाधव कामचलाऊ फिरकी गोलंदाजाची भूमिका चोख पार पाडू शकेल.

या सामन्यासाठी राहुलला संघात स्थान मिळणे कठीण होते. कारण एकदिवसीय प्रकारासाठी रोहित शर्मा आणि शिखर धवन ही सलामीची जोडी निश्चित आहे. कोहली तिसऱ्या, अंबाती रायुडू चौथ्या, धोनी पाचव्या आणि जाधव सहाव्या स्थानावर फलंदाजीला उतरतील.

भारतीय संघ जानेवारी २०१६मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला असताना मधल्या फळीतील फलंदाजीचा प्रश्न ऐरणीवर होता. ती मालिका भारताने १-४ अशी गमावली होती. मधल्या फळीत फक्त मनीष पांडेने अखेरच्या सामन्यात शतक झळकावून भारताला जिंकवून दिले होते. त्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत शर्मा आणि कोहली यांनी अनुक्रमे ४४१ आणि ३८१ धावा केल्या होत्या. याप्रमाणे धवनच्या खात्यावर २८७ धावा जमा होत्या.

डेव्हिड वॉर्नर (२०१६मधील तीन सामन्यांत २२० धावा) आणि स्टीव्ह स्मिथ (२०१६मधील पाच सामन्यांत ३१५ धावा) यांची अनुपस्थिती एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियासाठी पुन्हा आव्हानात्मक ठरणार आहे. भारताविरुद्धच्या मालिकेसाठी मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हॅझलवूड या वेगवान माऱ्याच्या त्रिकुटाला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर पडणार आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यासाठी संघ जाहीर करताना नॅथन लायन या एकमेव फिरकी गोलंदाजाला स्थान दिले आहे. याचप्रमाणे २०१०नंतर प्रथमच पीटर सिडल एकदिवसीय संघात परतला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेंड्रॉफ एकदिवसीय पदार्पण करणार आहे.

यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रथमच सलामीला उतरणार आहे. कर्णधार आरोन फिंचसोबत तो ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात करणार आहे. उस्मान ख्वाजा, शॉन मार्श आणि पीटर हँड्सकोम्ब मधल्या फळीत फलंदाजीला उतरतील. यात मार्कस स्टॉयनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांचाही समावेश आहे.

शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय फलंदाजीचे तीन प्रमुख आधारस्तंभ आहेत. ते वेगाने धावा करतात आणि खेळपट्टीवर टिकून राहतात. त्यामुळे त्यांना लवकर बाद करण्यासाठी आम्ही योग्य रणनीती आखली आहे. भारताकडे फिरकी गोलंदाजीचेही अनेक पर्याय उपलब्ध आहेत.  -आरोन फिंच, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

पंडय़ा-राहुल प्रकरणामुळे संघावर कोणतेच मानसिक दडपण आलेले नाही. संघरचना बदलली, तरी आमच्यासाठी फारशी चिंता नसेल. अष्टपैलू हार्दिक पंडय़ा नसल्यामुळे आता रवींद्र जडेजाचा उत्तम पर्याय आमच्याकडे आहे.    – विराट कोहली, भारताचा कर्णधार

First Published on January 12, 2019 12:10 am

Web Title: india vs australia preview 1st odi