गाबाच्या मैदानावर चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. भारतीय संघाने तीन गडी राखत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि २-१ ने मालिका खिशात घातली. गाबाच्या मैदानावर १९८८ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्यासाठी हा खूप मोठा आनंदाचा क्षण असून हा विजय १९८३ च्या वर्ल्डकपपेक्षाही मोठा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

“खेळात अप आणि डाउन येत असतात, त्यामुळे याची मला सवय आहे. पण संघाने इतकी चांगली कामगिरी केली आहे की मला शब्दांमध्ये ती सांगण्याची गरज नाही. भारतीय खेळाडूंनी आपल्या क्रिकेटमधून उत्तर दिलं आहे. हेच सर्वात मोठं स्टेटमेंट आहे,” असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.

भारताच्या पराभवाचं भाकीत वर्तवणाऱ्या क्लार्क, पाँटिंग, वॉला आनंद महिंद्रांचा टोला; म्हणाले…

रवी शास्त्री यांनी यावेळी विराट कोहलीचाही उल्लेख केला. भारतीय संघ मजबूत करण्यासाठी विराट कोहली गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सतत प्रयत्न करुन अखेर त्याचं फळ मिळाल्याचं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. रवी शास्त्री यांनी यावेळी अंजिक्य रहाणेलाही विजयाचं श्रेय दिलं. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने मोलाची कामगिरी केली आहे.

“सध्याच्या भारतीय संघ जबरदस्त आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ३६ धावांवर ऑल आऊट झाल्यानंतरही पुनरागमन करु असा विश्वास संघाला होता. विराट शारिरीकरित्या अनुपस्थित असला तरीही त्याचा आभास संघासोबत होता, कारण हा संघ एका रात्रीत उभा राहिलेला नाही. गेल्या पाच ते सहा वर्षात संघ उभा राहिला आहे. यामागे विराट कोहलीची मेहनत आहे,” असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.

“यानंतर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने संघाचं नेतृत्व केलं. तो बाहेरुन शांत आणि संयमी वाटत असला तरी आतून एक खरा लढवय्या आहे. विराट पुन्हा भारतात परतल्यानंतर अजिंक्यने ज्या पद्धतीने संघ हाताळला ते अविश्वसनीय आहे,” अशा शब्दांत रवी शास्त्री यांनी कौतुक केलं आहे.