ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतीनं ग्रासलं आहे. एकापोठापाठ एक भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त होत आहे. मोहम्मद शमी, उमेश यादव, के. एल राहुल, हनुमा विहारी आणि रविंद्र जाडेजा अशा खेळाडूंना ऑस्ट्रेलियात दुखापत झाली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या रविंद्र जाडेजावर सिडनी येथे यशस्वी शस्त्रक्रीया झाली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर रविंद्र जाडेजाच्या डाव्या हाताचा अंगठ्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रीया यशस्वी झाली आहे. रविंद्र जाडेजानं ट्विट करत ही माहिती दिली आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना मिचेल स्टार्कने टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू टोलावताना जडेजाचा अंगठा दुखावला गेला होता. दुखापत असतानाही सामना वाचवण्यासाठी वेदनाशामक इंजेक्शन घेऊन मैदानात फलंदाजीस उतरण्यास जाडेजा तयार झाला होता. मात्र तशी वेळ आली नाही. सामन्यानंतर सिडनीतच त्याच्यावर शस्त्रक्रीया झाली आहे.

आणखी वाचा- दुखापत… दुखापत आणि दुखापतच; बुमराहनंतर मयांक, अश्विनही जायबंदी

जाडेजानं आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘ दुखापतीमुळे थोडया कालावधीसाठी क्रिकेटच्या रोमांचापासून दूर जात आहे. शस्त्रक्रीया यशस्वी पार पडली. लवकरच नव्या जोशानं मैदानात परत येईल.’

आणखी वाचा- ICC क्रमवारीत ऋषभ पंतची भरारी, विराट कोहलीची घसरण

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजावर यशस्वी शस्त्रक्रीया झाली असली तरी तो मायदेशात होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पहिल्या डावात चार बळी घेत होते. फलंदाजीदरम्यान मिचेल स्टार्कने टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू टोलावताना जडेजाचा अंगठा दुखावला गेला. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही. ‘‘जडेजाला बरा होण्यासाठी ४ ते ६ आठवडय़ांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळू शकणार नाही. भारताला कसोटी वाचवायची असल्यास, जडेजा वेदनाशामक इंजेक्शन घेऊन मैदानात फलंदाजीस उतरण्याची शक्यता आहे,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे सुरुवात होत आहे.