अ‍ॅडलेडचा मानहानीकारक पराभव ते मेलर्बनवरील ऐतिहासिक विजय हे जय-पराजयाचे दोन टोकाचे क्षण भारतीय क्रिकेट संघाने १० दिवसांत अनुभवले. सिडनीत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतील विजयासह नव्या वर्षांचा यशस्वी प्रारंभ करण्याचा निर्धार कर्णधार अजिंक्य रहाणेने केला आहे. भारतासाठी आतापर्यंत अपयशी ठरणाऱ्या सिडनीत धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या समावेशामुळे विजयी परिवर्तन साकारता येईल, हीच भारतीय क्रिकेटचाहत्यांची अपेक्षा आहे.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर गेली अनेक वर्षे भारतीय संघाने संस्मरणीय फलंदाजी केली आहे. परंतु जय-पराजयाच्या सांख्यिकीत मात्र ऑस्ट्रेलियाने कमालीचे वर्चस्व राखले आहे. या मैदानावर भारताने सहा सामने गमावले आहेत, तर एकमेव विजय ४२ वर्षांपूर्वी मिळवता आला आहे.

भारतीय संघ सिडनीच्या विजयासह मालिकेत २-१ अशी आघाडी घेऊन बोर्डर-गावस्कर चषकावर पुन्हा दावा करण्यासाठी उत्सुक आहे. विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर पितृत्वाच्या रजेवर आहे, तर मोहम्मद शमी, उमेश यादव आणि के. एल. राहुल यांना दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. जागतिक दर्जाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने दुखापतीमुळे मालिकेआधीच माघार घेतली.

रोहितसह पाच खेळाडू शनिवारी जैव-सुरक्षेच्या नियमाचा भंग केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले. या प्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे. मयांक अगरवालच्या जागी रोहित शुभमन गिलच्या साथीने भारताच्या डावाला प्रारंभ करील.

सैनीचे पदार्पण

उमेशच्या जागी वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. रविचंद्रन अश्विनच्या फिरकीचा ऑस्ट्रेलियाने धसका घेतला असून, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबूशेन यांच्यासारख्या दर्जेदार फलंदाजांनाही अश्विनने तंबूची वाट दाखवून दरारा निर्माण केला. जसप्रित बुमरा वेगवान माऱ्याचे आत्मविश्वासाने नेतृत्व करीत आहे. त्याच्या साथीला सिडनीत सैनी आणि मोहम्मद सिराज हे युवा गोलंदाज असतील.

फलंदाजाना अनुकूल खेळपट्टी

सिडनीची खेळपट्टी ही फलंदाजांना अनुकूल ठरत आली आहे. सुनील गावसकर, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, पुजारा आणि ऋषभ पंत यांनी या मैदानावर शतके झळकावली आहेत. खेळपट्टी टणक असून, त्यावर मुबलक गवत आहे, असे खेळपट्टीतज्ज्ञ अ‍ॅडम लेविस यांनी सांगितले.

वॉर्नरचे पुनरागमन

मेलबर्नचा पराभव जिव्हारी लागलेल्या ऑस्ट्रेलियाने सिडनीच्या दृष्टीने ७० टक्के तंदुरुस्त वॉर्नरला संघात स्थान दिले आहे. ‘‘वॉर्नर उत्साही आणि व्यावसायिक क्रिकेटपटू आहे. तो उत्तम आत्मविश्वासाच्या बळावर आपली भूमिका चोख बजावेल,’’ असा विश्वास पेनने व्यक्त केला.

रहाणेसाठी व्यूहरचना

मेलबर्नवर संस्मरणीय शतकी खेळी आणि नेतृत्वगुणामुळे लक्ष वेधून घेणाऱ्या रहाणेला जेरबंद करण्यासाठी मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि नॅथन लायन या ऑस्ट्रेलियाच्या चौकडीने अचूक व्यूहरचना आखली असेल. राहुलच्या दुखापतीमुळे हनुमा विहारीला आणखी एक संधी मिळाली आहे.

स्मिथसाठी धोक्याची घंटा

स्मिथ धावांसाठी झगडतो आहे, ही ऑस्ट्रेलियासाठी चिंतेची बाब ठरत आहे. पहिल्या कसोटीत १, १* आणि दुसऱ्या कसोटीत ०, ८ अशा प्रकारे दोन आकडी धावाही त्याला करता आलेल्या नाहीत. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आहे. त्यामुळे स्मिथसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकेल.

रोहित-वॉर्नर यांची कामगिरी निर्णायक -मॅकग्रा

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील उर्वरित दोन कसोटी सामन्यांत रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर या दोन्ही फलंदाजांची आपापल्या संघासाठीची कामगिरी मालिकेचे भवितव्य ठरवेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने व्यक्त केले.

उभय संघांत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी मॅकग्रा फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमानिमित्त सिडनीचे स्टेडियम गुलाबी रंगात रंगणार आहे. पहिल्या दोन कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी निराशा केली, तर भारतीय संघाकडूनही अजिंक्य रहाणेशिवाय आघाडीच्या पाच फलंदाजांपैकी कोणीही फारशी चमक दाखवली नाही. त्यामुळे रोहित आणि वॉर्नर यांचे पुनरागमन मालिकेतील चुरस वाढवण्याच्या दृष्टीनेसुद्धा महत्त्वाचे ठरेल, असे मॅकग्राला वाटते.