सिडनीच्या तिसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस एकंदरीतच भारतासाठी ‘शुभ’वर्तमान ठरला. रवींद्र जडेजाची प्रभावी फिरकी आणि शुभमन गिलचे दमदार अर्धशतक यामुळे धावांसाठी झगडणाऱ्या स्टीव्ह स्मिथची झुंजार शतकी खेळी पूर्णत: झाकोळली. २ बाद १६६ अशी पहिल्या दिवशी आश्वासक सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३३८ धावांत रोखून भारताने २ बाद ९६ असा दिमाखदार प्रारंभ केला.

सिडनी क्रिकेट मैदानाच्या पाटा खेळपट्टीवर स्मिथ (२२६ चेंडूंत १३१ धावा) आणि मार्नस लबूशेनने (१९६ चेंडूंत ९१ धावा) २ बाद २०६ धावसंख्येपर्यंत ऑस्ट्रेलियाला नेत पहिल्या तासाभरात आशा उंचावल्या. परंतु ऑस्ट्रेलियाचा संघ ४५०हून अधिक धावा पहिल्या डावात नोंदवेल, ही अपेक्षा फोल ठरली. या दोघांनंतर मिचेल स्टार्क (२४) वगळता एकाही फलंदाजाने खेळपट्टीवर फार काळ तग न धरल्याने ३३८ धावांत त्यांचा डाव आटोपला. जडेजाने ६२ धावांत ४ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुंग लावला. याशिवाय दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्मिथला डीप स्क्वेअर लेगवरून एकहाती थेट फेक करीत धावचीत करीत जडेजाने सामन्याला कलाटणी दिली.

शुक्रवारी पहिल्या दोन सत्रांत ५१ षटकांत ऑस्ट्रेलियाने १७२ धावांची भर घतली, परंतु त्यांचे आठ फलंदाज बाद झाले. जडेजा आणि बुमरा यांनी टिच्चून गोलंदाजी करीत ऑस्ट्रेलियावर दडपण आणले. परंतु अननुभवी नवदीप सैनी महागडा ठरला. पहिल्या सत्रात शतकाकडे कूच करणाऱ्या लबूशेनला जडेजाने तंबूची वाट दाखवली. पहिल्या स्लिपमध्ये अजिंक्य रहाणेने त्याचा सुरेख झेल टिपला. लबूशेनने १९६ चेंडूंत ११ चौकारांसह आपली खेळी साकारली. स्मिथने पुढच्याच षटकात अर्धशतक पूर्ण केले. एकीकडे जडेजा ऑस्ट्रेलियाला हादरे देत होता, तर दुसरीकडे भरवशाच्या जसप्रीत बुमराने कॅमेरून ग्रीन आणि कर्णधार टिम पेन हे महत्त्वाचे अडसर दूर केले. पॅट कमिन्स बाद झाल्यानंतर स्मिथने सामन्याची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती घेतली. त्याने आक्रमकतेचा प्रत्यय देत तळाच्या फलंदाजांना साथीला घेत ११ षटकांत ६० धावांची भर धावसंख्येत घातली. स्टार्कला तीन धावा काढत स्मिथने कसोटी क्रिकेटमधील २७वे शतक साकारले आणि त्यानंतर तो सर्वात शेवटी बाद झाला.

त्यानंतर, भारतीय डावात गिलने (१०१ चेंडूंत ५० धावा) कारकीर्दीतील दुसऱ्या कसोटीत पहिले अर्धशतक संयमाने झळकावले. नॅथन लायनला त्याने अप्रतिम कव्हर ड्राइव्हज फटकावले, तर कमिन्सच्या माऱ्याचा बचावात्मकरीत्या प्रतिकार केला. या २१ वर्षीय सलामीवीराने रोहित शर्माच्या (७७ चेंडूंत २६ धावा) साथीने २७ षटकांत ७० धावांची सलामी दिली. या मालिकेत प्रथमच भारताची सलामीची जोडी खेळपट्टीवर टिकाव धरू शकली. खेळ थांबला, तेव्हा अजिंक्य रहाणे (४० चेंडूंत ५* धावा) आणि चेतेश्वर पुजारा (५३ चेंडूंत ९* धावा) खेळत होते. या पाश्र्वभूमीवर शनिवारी सामन्याचा दिवस निर्णायक ठरेल.

संक्षिप्त धावफलक

– ऑस्ट्रेलिया (पहिला डाव): १०५.४ षटकांत सर्व बाद ३३८ (स्टीव्ह स्मिथ १३१, मार्नस लबूशेन ९१, विल पुकोवस्की ६२; रवींद्र जडेजा ४/६२, जसप्रीत बुमरा २/६६)

– भारत (पहिला डाव): ४५ षटकांत २ बाद ९६ (शुभमन गिल ५०; पॅट कमिन्स १/१९)

स्मिथचा धावचीत आजवरचा सर्वोत्तम – जडेजा

शतकवीर स्मिथला मोक्याच्या क्षणी ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेरून धावचीत केल्याचा क्षण मी कधीच विसरणार नाही, अशी कबुली भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने दिली. पहिल्या डावातील चार बळी आणि स्मिथला धावचीत केल्याचा क्षण, यापैकी एकाचीच निवड करायची असल्यास तो कुणाला निवडशील असे विचारले असता, भारताचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक जडेजा म्हणाला, ‘‘कारकीर्दीत मी आजवर अनेकदा चार-पाच बळी मिळवले आहेत, परंतु स्मिथला धावचीत केलेल्या क्षणाची चित्रफीत मी सातत्याने पाहू शकतो. कारण त्या वेळी शतकवीर स्मिथने अधिक आक्रमक रूप धारण केले होते. त्याशिवाय डीप स्क्वेअर लेगच्या येथून धावत येत ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेरूनच मी थेट यष्टय़ांचा वेध घेतल्याने, हा धावचीत मला कायमस्वरूपी स्मरणात राहील,’’ असे जडेजा म्हणाला.