बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनीतील तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात भारताला यश आलं आहे. खरंतर या कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजयाची सर्वाधिक संधी होती. पण ऋषभ पंत त्यानंतर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाला विजयापासून दूर ठेवलं. एक प्रकारे हा भारताचा नैतिक विजय आहे.

सामन्यानंतर बोलताना कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की, “निकालाचा विचार न करता शेवटपर्यंत झुंज द्यायची असं आम्ही ठरवलं होतं. संपूर्ण सामन्यात आणि आजही आम्ही ज्या प्रकारचा खेळ केला, त्याने खरोखरद आनंदी आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या दोन बाद २०० धावा होत्या. त्यानंतर त्यांना ३३८ धावांवर रोखणे ही सुद्धा चांगली कामगिरी आहे.” मालिकेत सध्या दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत.

“अजून काही ठिकाणी आम्ही सुधारणा करु शकतो. खासकरुन मी विहारी आणि अश्विनचा उल्लेख करीन. शेवटी या दोघांनी ज्या प्रकारची फलंदाजी केली, ते पाहणे खरोखरच आनंददायी होते. पंतला सुद्धा याचे श्रेय जाते. आम्ही रणनिती आखली होती. पण शेवटी त्यावर अमलबजावणी करणे खेळाडूंवर असते असे अजिंक्य म्हणाला.”

रोहित शर्मा बद्दल अजिंक्य रहाणे म्हणाला…
“रोहित शर्मा संघात परतल्याचा निश्चित आनंद आहे. नेटमध्ये त्याने खूपच चांगली फलंदाजी केली. सैनीसाठी सुद्धा आनंदी आहे. त्याने खूप मेहनत केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो चांगली कामगिरी करतोय. मागच्या सामन्यात सिराज होता. या सामन्यात सैनी होता. आम्ही कसोटीवर लक्ष केंद्रीत केले आहे. अ‍ॅडलेट आणि मेलबर्नमध्ये जे झाले, तो इतिहास आहे. आम्हाला इथे नव्याने सुरुवात करायची होती. कसोटी क्रिकेट म्हणजे प्रत्येक सत्रात तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी करणे”  असे अजिंक्य रहाणेने सांगितले.