दुखापतीनंतर एखाद्या योद्ध्याप्रमाणे मैदानावर तग धरून हनुमा विहारी आणि अश्विन यांनी तब्बल २५९ चेंडू खेळून काढत तिसरी कसोटी अनिर्णीत राखत, बॉर्डर गावसकर मालिका १-१ बरोबरीत सोडली आहे. विहारी-अश्विन दोघेही फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाले होते. अशा परस्थितीतही दोघांनी संयमी फलंदाजी करत सामना वाचवला. विहारी-अश्विन यांनी सहाव्या गड्यासाठी २५९ चेंडूत ६२ धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघानं पाच गड्यांच्या मोबदल्यात ३३४ धावापर्यंत मजल मारली.

पाचव्या दिवशी फलंदाजी करताना विहारीनं १६१ चेंडूचा सामना केला. तर अश्विननं विहारीला संयमी साथ देत १२८ चेंडूचा सामना केला. एकवेळ भारतीय संघ सामना गमावेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या जोडीनं संयमी आणि चिवट फलंदाजी करत २५९ चेंडूचा सामना करत भारताचा पराभव टाळला. ऑस्ट्रेलियानं विहारी-अश्विन यांची जोडी फोडण्यासाठी पराकठीचे प्रयत्न केले. कर्णधार पेन यानं तर स्लेजिंगचाही वापर केला. मात्र, अश्विन-विहारी यांनी आपला संयम ढासळू देता भारताचा पराभव टाळला. यांच्या फलंदाजीचं सोशल मीडियावर कौतुक होतं आहे.

आणखी वाचा- सिडनी कसोटीतील भारताच्या कामगिरीवर कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला…

भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने पुजाराच्या साथीने पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात केली. पहिल्या सत्रात रहाणे लगेचच बाद झाला. पण त्यानंतर ऋषभ पंतने सामन्याची सूत्र हाती घेतली. त्याने सुरूवातीला सावध खेळ केला, पण नंतर मात्र त्याने सुसाट फलंदाजी केली. त्याचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. पंतने १२ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करत ११८ चेंडूमध्ये ९७ धावा कुटल्या. नॅथन लायनच्या फिरकीपुढे तो बाद झाला. त्यानंतर काही वेळाने अत्यंत संयमी खेळी करणारा पुजारादेखील त्रिफळाचीत झाला. त्याने २०५ चेंडूत ७७ धावा केल्या.

आणखी वाचा- ऋषभ पंत; यष्टीमागे गमावलं, पण यष्टीसमोर कमावलं

ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी यांच्या तडाखेबाज फलंदाजीमुळे भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण पंत आणि पुजारा बाद झाल्यानंतर भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली. रविंद्र जाडेजा दुखापतग्रस्त होता. त्यातच भर म्हणून हनुमा विहारीला दुखपत झाली. हनुमा विहारीला धावणेही कठीण झालं होतं. त्यामुळे अश्विन आणि हनुमा विहारीनं सामना वाचवण्याच्या दृष्टीनं फलंदाजी केली. अश्विन-विहारी यांनी संयमी फलंदाजी करत अखेर सामना वाचवला. विहारीनं नाबाद २३ तर अश्विननं नाबाद ३९ धावांची खेळी केली.

आणखी वाचा- विरेंद्र सेहवागनं पाँटिग गुरुजींना केलं ट्रोल, पाहा नेमकं काय आहे प्रकरण

दुखापतीचं सत्र सुरुच –
भारतीय संघा दुखापतीमुळे बेजार झाला आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना हनुमा विहारीही दुखापतग्रस्त झाला आहे. याआधीच शमी, उमेश यादव, के. एल राहुल यांनाही कसोटी मालिकेत दुखापत झाली होती. त्यात भर म्हणून तिसऱ्या कसोटी सामन्यात तीन खेळाडूंना दुखापत झाली आहे. चौथ्या कसोटी सामन्यात विहारी, जाडेजा यांच्या जागी कोणाला संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पंतची दुखापत गंभीर नाही. मात्र, सामन्यानंतरच त्याच्या दुखापतीबाबत स्पष्ट होईल.

आणखी वाचा- चेतेश्वर पुजारा ‘सहा हजारी’ मनसबदार; या खेळाडूंनीही केलाय हा कारनामा

पंत-विहारीची झुंज –
ऋषभ पंत आणि हनुमा विहारी यांनी दुखापतीनंतरही आपल्या खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवलं. तिसऱ्या कसोटीतील भारतीय संघाची परिस्थिती पाहून दोघांनीही एखाद्या योध्याप्रमाणे तग धरत कांगारुच्या भेदक माऱ्याचा सामना केला.