21 January 2018

News Flash

टी-२० सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्मिथ मालिकेतून ‘आऊट’

स्मिथचा भार वॉर्नरच्या खांद्यावर

ऑनलाइन टीम | Updated: October 7, 2017 12:42 PM

स्टिव्ह स्मिथ

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथने खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे या मालिकेतूनच माघार घेतली आहे. स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका ४-१ अशा फरकाने गमावली होती. त्यानंतर आता स्मिथने माघार घेतल्याने ट्वेन्टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या आहेत. स्मिथच्या अनुपस्थितीत सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलिया संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. टी-२० मालिकेत भारताचे आव्हान परतवण्यासाठी त्याला फलंदाजीसह कर्णधारपदाची जबाबदारीही सांभाळावी लागणार आहे. दुसरीकडे यष्टीरक्षक पेनला सलामीवीराची भूमिका पार पाडावी लागू शकते.

टी-२० मालिकेतील पहिला सामना आज रांचीच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी सराव करत असताना स्मिथच्या खांद्याला दुखापत झाली होती. दुखापतीनंतर स्मिथला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची एमआरआय तपासणीनी केल्यानंतर तो मैदानात उतरण्यास सज्ज होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी स्मिथ सराव करताना दिसला नाही. आगामी अॅशेस मालिकेचा विचार करुन ऑस्ट्रेलिया बोर्डाने त्याला मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २३ नोव्हेंबरपासून अॅशस मालिका रंगणार आहे.

एकदिवसीय मालिकेतील सातत्य कायम राखून टी-२० मालिकेत दमदार कामगिरी करण्यासाठी विराट ब्रिगेड उत्सुक असेल. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन पुन्हा मैदानात उतरत असून तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर जलदगती नेहरा गोलंदाजीतील धार दाखवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेसाठी दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळाले आहे. त्याला टीम इलेव्हनमध्ये स्थान मिळणार का? हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

First Published on October 7, 2017 12:42 pm

Web Title: india vs australia t20 steve smith ruled out of series due to shoulder injury
  1. No Comments.